रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलपासून पुढील सप्ताहात जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसंदर्भात सर्व लोकांपर्यंत माहिती पोहोचावी, तसेच काही तक्रारी, शंका असल्यास त्याचे निराकरण व्हावे, या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाच्या जात पडताळणी समिती कार्यालयाने १९ आणि २० एप्रिल रोजी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसंदर्भात माहिती होण्यासाठी १९ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत वेबिनार होणार आहे. या वेबिनारमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज कोणत्या प्रकारे भरावे, कोणत्या प्रकारचे दस्तऐवज जोडावे आदी माहिती देण्यात येणार आहे. ही माहिती मिळाल्याने अर्जदार अर्ज सादर करताना ऑनलाईन सुविधेचा अचूकपणे वापर करतील, हा यामागचा उद्देश आहे.
तसेच जात पडताळणी प्रक्रियेविषयी २० एप्रिल रोजी ऑनलाईन पध्दतीने तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत तक्रार निवारण करण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांनी समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करुन ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, अशाच अर्जदाराच्या तक्रारीचे निवारण केले जाईल, असे संशोधन अधिकारी संतोष चिकणे यांनी कळविले आहे.
१९ रोजी ऑनलाईन होणाऱ्या वेबिनारसाठी https://meet.google.com/dgp-bjwj-fhe या लिंकद्वारे सहभागी व्हावे तसेच ऑनलाईन तक्रार निवारणासाठी http://meet.google.com/kjn-rzxv-xxj या लिंकद्वारे सहभागी व्हावे, असे आवाहनही या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.