शोभना कांबळे रत्नागिरी : मोबाईल सेवा सुरू झाल्याने दूरध्वनीचा वापर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे काही ठिकाणच्या उपकेंद्रांमध्ये जोडण्यांची संख्या कमी आहे. अशा उपकेंद्रांपासून भारतीय दूरसंचार निगमला (बीएसएनएल) फायद्याऐवजी तोटाच अधिक होत असल्याने २०पेक्षा कमी ब्रॉडबँड किंवा दूरध्वनी जोडण्या असलेली जिल्ह्यातील १५ उपकेंद्र बंद करण्यात येणार आहेत. तशा सूचना कंपनीकडून तातडीने देण्यात आल्या आहेत.भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडने आपली दूरध्वनी सेवा अगदी खेडोपाडी पोहोचवली. तांत्रिक अडचणी लक्षात घेता कुठल्याच खासगी कंपनीने दूरध्वनी सेवा सुरू केली नाही. एवढेच नव्हे तर बीएसएनएलने बहुतांश दूरध्वनी सेवेला जोडून ब्रॉडबँड सेवाही दिलेली आहे.खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत उतरण्यासाठीही आॅक्टोबर २००० सालापासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेली भ्रमणध्वनी सेवा बीएसएनएलने जिल्ह्यात सर्वत्र सुरू केली.रत्नागिरीत भ्रमणध्वनी सेवा २००९ सालापासून सुरू झाली. या सेवेने सर्व वयोगटातील व्यक्तिंना आकर्षित केली. अल्पावधीतच ही सेवा अत्यावश्यक ठरली. आता तर व्यक्तीगणिक नव्हे; तर एक व्यक्ती एकापेक्षा जास्त मोबाईल वापरू लागली आहे. त्यामुळे आता मोबाईलची संख्या वाढल्याने दूरध्वनींचा वापर कमी झाला आहे.
विविध आस्थापना तसेच शासकीय कार्यालयेवगळता घरातील दूरध्वनी कालबाह्य होऊ लागले आहेत. त्यामुळे काहींनी दूरध्वनी सेवा बंद केली तर अनेकांचे दूरध्वनी केवळ शोभेपुरतेच राहिले. काहींनी ब्रॉड बँडसेवेपुरताच उपयोग मर्यादित ठेवला.मोबाईलचा वापर वाढल्याने संपूर्ण देशासह रत्नागिरी जिल्ह्यातील दूरध्वनी सेवा कोलमडली. त्यामुळे एका उपकेंद्रांच्या अखत्यारित असलेल्या किरकोळ दूरध्वनी जोडण्यांच्या माध्यमातून कंपनीला महिना केवळ २ ते ५ हजार रूपये एवढे उत्पन्न मिळते, मात्र, त्या उपकेंद्राच्या वीजबिल, दुरूस्ती तसेच मनुष्यबळासाठी १५ ते २० हजार रूपये खर्च करावे लागतात. त्यामुळे कंपनीला वर्षाकाठी सुमारे चार कोटीचा तोटा सोसावा लागत आहे.संपूर्ण देशभरच ही स्थिती असल्याने कंपनीने ज्या उपकेंद्राच्या अखत्यारित २०पेक्षा कमी दूरध्वनी तसेच ब्रॉडबँड जोडण्या आहेत. ती उपकेंद्र बंद करण्याचा निर्णय गतवर्षी घेतला. महाराष्ट्रात त्याचा अंमलही सुरू झाला. मात्र, रत्नागिरीत वर्षभर ही सेवा सुरूच होती. परंतु या कंपनीला दरवर्षीच एवढा मोठा तोटा सोसावा लागत आहे.सध्या जिल्ह्यात १६८ उपकेंद्रांत एकूण ३० हजार दूरध्वनीधारक आहेत. त्यापैकी २०पेक्षा कमी जोडण्या असलेली १५ उपकेंद्र बंद होणार आहेत. या केंद्रांना कंपनीकडून तशा नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.बीएसएनएल ग्राहकबीएसएनएलचे २०१५ साली जिल्ह्यत २,१०,००० मोबाईलधारक, ४५,००० दूरध्वनीधारक, तर १० हजार ब्रॉडबँडधारक होते. मात्र, मोबाईलची संख्या वाढून ती आता ३ लाखांपर्यंत गेली असून, दूरध्वनीधारकांची संख्या ३० हजारावर आली आहे. ११ हजार ब्रॉडबँडधारक आहेत.जिथे बीएसएनएलचे टॉवर आहेत, त्यांचे बिल व्यापारी दराने आकारले जाते. मात्र, उपकेंद्रांना घरगुती पद्धतीने आकारणी केली जाते. जिथे टॉवर आणि उपकेंद्र एकाच ठिकाणी आहेत तरीही महावितरणकडून उपकेंद्रांना मात्र सापत्नभाव जात असल्याने उपकेंद्रांचे बिल भरमसाठ होते.बंद होणारी उपकेंद्र (तालुकानिहाय)
- दापोली : कादवली
- राजापूर : मूर, भालावली,
- केळवली, सोलगाव
- संगमेश्वर : करजुवे,
- कनकाडी, पोचरी
- लांजा : विलवडे, हर्चे, कणगवली
- चिपळूण : दहीवली, बोरगाव, नांदगाव
- रत्नागिरी : डोर्ले