चिपळूण : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत, भात संशोधन केंद्र, कर्जत व अखिल भारतीय समन्वयित, मसाले पिके संशोधन योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, चिपळूण-रत्नागिरी व रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पूर्व लागवडीचे नियोजन (भात व हळद) याविषयी ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना घरबसल्या माहिती मिळावी व त्यांचे प्रबाेधन व्हावे, या हेतूने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भात विशेषतज्ज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांनी संशोधन केलेल्या विविध भाताच्या वाणांची माहिती, खरीपपूर्व भात लागवडीचे नियोजन, भात लागवडीच्या नवीन पद्धत्ती, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन याचे संपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच डॉ. प्रफुल्ल माळी यांनी हळद लागवडीबद्दल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, रत्नागिरीचे कार्यक्रम समन्वयक विक्रम सरगर यांनी कार्यक्रमात सहभाग घेत कृषी सखी यांनी जास्तीत-जास्त माहिती घेतली. ही माहिती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, असे सांगितले. तालुका अभियान अधिकारी अमोल काटकर यांनी माहितीचा योग्य उपयोग करून शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन केले.
तसेच रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे व कार्यक्रम सहायक चिन्मय साळवी यांनी केले. शेती, पशुपालन व मत्स्य पालन याबाबत माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन राजेश कांबळे यांनी केले.