अडरे : चिपळूण तालुक्यातील कोंढे कुळेवाडी येथे कुणबी समाजोन्नती संघ शाखा चिपळूण संलग्न कुणबी युवा चिपळूण यांच्या वतीने दुसरे सम्राट बळीराजा वाचनालय सुरू करण्यात आले. या वाचनालयाचे उद्घाटन कोंढे गावच्या सरपंच माधवी कुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कुणबी युवा चिपळूणतर्फे एकाच दिवशी दोन वाचनालयाचे उद्घाटन करून समाजात वाचन चळवळ उभारणीच्या कामाला प्रारंभ केला आहे.
युवकांना पुस्तकात समरस होता यावे आणि त्यांच्या वैचारिक क्षमतेमध्ये वाढ व्हावी, या हेतूने कुणबी युवा चिपळूण वाचनालय गावातून सुरू करीत आहे. युवाचे संघटक भरत धुलप यांच्या संकल्पनेतून गावा गावात वाचनालय सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. त्यानंतर, कुणबी युवा चिपळूण यांच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून, पहिले वाचनालय बामणोली आणि दुसरे कोंढे येथे सुरू केले आहे. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सरपंच माधवी कुळे यांनी केले, तर संभाजी महाराजांच्या प्रतिमेला भाई कुळे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर, सम्राट बळीराजा वाचनालयाचे उद्घाटन सरपंच माधवी कुळे यांच्या हस्ते करण्यात आले, तर श्रीफळ ॲड.अशोक निकम यांनी वाढविले. कार्यक्रमात युवाचे कल्पेश बाईत यांनी वाचनालयाची संकल्पना स्पष्ट करून सांगितली. त्यानंतर, ॲड.अशोक निकम यांनी माहिती दिली. या वाचनालय उद्घाटन कार्यक्रमाला युवाचे संघटक नितेश खाडे, प्रभारी सचिव कल्पेश बाईत, भरत धुलप, ओबीसी जनमोर्चा संघटनेचे प्रदीप संसारे ॲड.अशोक निकम, सरपंच माधवी कुळे, मंडळाचे अध्यक्ष दीपक कुळे, आत्माराम वरपे, जयवंत कुळे, भरत कुळे, प्रदीप कुळे, आणि श्री कुलस्वामी सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कुळे यांनी केले.