मनोज मुळयेरत्नागिरी : वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या बोलीभाषा, सोशल मीडियावर उडणारी भाषेची धुळदाण, अन्य भाषांमधील शब्दांनी केलेला शिरकाव, यामुळे प्रमाण मराठी भाषेत झालेली घुसखोरी अलिकडे चिंतेचा विषय झाली आहे. ही सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी प्रमाण मराठी भाषेचा प्रसार होणे आवश्यक आहे.
ही बाब लक्षात घेऊन राज्य मराठी विकास संस्थेने शालेय मराठी शब्दकोश तयार केला आहे आणि हा शब्दकोश शाळा-शाळांमध्ये फिरून पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. निधी पटवर्धन यांनी हाती घेतला आहे.माय मराठी वाचवा असा अनेक व्यासपीठांवरून होणारा आक्रोश केवळ ठरावांपुरता मर्यादीत राहतो. अनेक संमेलने, कार्यशाळा, सभांमध्ये त्यावर जोरदार चर्चा झाली. पण प्रत्यक्षात काही घडत नाही, आजवर घडले नाही, हा वर्षानुवर्षांचा अनुभव. मात्र, आता एक आशेचा किरण चमकला आहे. राज्य मराठी विकास संस्थेने शालेय मराठी शब्दकोश तयार केला आहे.
केवळ चांगले पुस्तक तयार झाल्याने मराठीचा प्रसार होणार नाही. ते पुस्तक लोकांपर्यंत पोहोचायला हवं आणि त्यांना त्याचं महत्त्व पटवून द्यायला हवं. आता हाच प्रयोग रत्नागिरीत सुरू झाला आहे. रत्नागिरीतील प्रा. निधी पटवर्धन यांनी या पुस्तकाच्या प्रसारासाठी शाळा-शाळांमध्ये फिरून पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे.केवळ हे एकच पुस्तक नव्हे तरविज्ञान संज्ञा संकल्पना हे मराठी विज्ञान परिषदेचे पुस्तकही जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न प्रा. पटवर्धन यांनी सुरू केला आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना विज्ञानातील संज्ञा पटकन कळाव्यात, या हेतूने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.शालेय मराठी शब्दकोश हा वसंत आबाजी डहाके आणि गिरीश पतके यांनी संपादित केला आहे. सरकार स्तरावर अशी अनेक पुस्तके, शब्दकोश येतात. मात्र, त्यातील किती सर्वसामान्यांपर्यंत जातात, हे थोडे संशोधनाचेच काम. मात्र, रत्नागिरीत हा शब्दकोश लोकांपर्यंत नेण्याचा उपक्रम यशस्वी होऊ लागला आहे. तब्बल ७०० लोकांनी हा शब्दकोश विकत घेतला आहे.वाचन हरवलेलेखन कौशल्य हा अभ्यासक्रमातील एक भाग आहे. मात्र वाचनामध्ये प्रगती व्हावी, यासाठी अभ्यासक्रमात कोणतेही उपक्रम नाहीत. वाचताना अनेक शब्द अडतात. ते शोधण्याने आपण प्रगती करतो. त्यामुळे वाचनाला महत्त्व देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने सर्वच स्तरावरील शिक्षण ही आता औपचारिकता राहिली आहे.
पूर्वी अनेक घरांमध्ये मुलांकडून पुस्तके, वर्तमानपत्रे वाचून घेतली जात असत. त्यातून मुलांची शब्दांशी जवळीक वाढत असे. मात्र, आता घरगुती पातळीवरही ही पद्धत संपून गेली आहे. त्यामुळे शब्द अडण्याचे प्रसंगच येत नाहीत. अडलेच तर त्यावर शोधण्याचे प्रयत्न होत नाहीत. त्यासाठी हा उपक्रम उपयोगी पडणार आहे.भेट देण्यासाठी शब्दकोशआपण शाळांमध्ये फिरून शिक्षक-पालकांशी संपर्क केला तसाच सोशल मीडियावरूनही अनेकांशी संपर्क साधला. त्यालाही खूप मोठा प्रतिसाद मिळाला. काही संस्थांनी विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात शब्दकोश भेट देण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. तशा संस्थांनीही कोशाला चांगला प्रतिसाद दिला असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.मराठीतील घुसखोरी वाढतीप्रत्येकालाच अनेकदा शब्द अडतात. एखाद्या गोष्टीला नेमका मराठी शब्द काय वापरावा, हे लक्षात येत नाही. अशावेळी नेमका शब्द शोधण्याऐवजी तेथे इंग्रजी शब्द वापरून वेळ मारून नेली जाते. त्याचा तसाच वापर लिखित भाषेतही केला जातो. त्यामुळेच मराठी भाषेत अन्य भाषेतील शब्दांनी मोठी घुसखोरी केली आहे. या शब्दकोशामुळे मराठी शब्दांचे भांडारच सर्वांसाठी खुले झाले आहे. मराठी भाषेतील या घुसखोरीचा सर्वाधिक त्रास शिक्षकांनाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षकांनाही त्याची विशेष माहिती दिली जात आहे.धोपटे काखोटीला मारूनरत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. पटवर्धन या एकतर शिक्षक-पालक सभेच्या दिवशी नाहीतर शनिवारी आपली महाविद्यालयाची वेळ संपल्यानंतर शाळांना भेटी देतात. शब्दकोश सोबत घेऊनच त्या शाळांमध्ये जातात आणि शिक्षक, पालकांमध्ये वितरित करून येतात. शिक्षक म्हणून हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आपल्याला वेगळाच आनंद मिळतो, असे प्रा. पटवर्धन यांनी सांगितले.
प्रसाराची कल्पना महत्त्वाचीतसं पाहिलं तर सरकारी स्तरावर अनेक पुस्तके, कोश, ग्रंथ तयार होतात. मात्र, वितरणाच्यादृष्टीने त्याकडे लक्ष दिले जात नाही. यावेळी मात्र रत्नागिरीतील एका प्राध्यापिकेने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत प्रा. निधी पटवर्धन यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या २२ शाळांसह शहर व परिसरातील हायस्कूलमध्येही भेटी दिल्या आहेत. शाळेत पालक सभा असताना त्या शाळेत जातात आणि तेथे सभेचे मुख्य विषय संपल्यानंतर त्या शब्दकोशाची माहिती देतात. जर हा प्रयत्न केला नसता तर हा शब्दकोश इतक्या पालकांपर्यंत जाणे शक्यच नव्हते.उत्तम प्रतिसादशब्दकोशाच्या प्रसारानिमित्त आपली अनेक पालकांशी भेट झाली. आपल्याला सगळे मराठी समजते, असे सर्वांनाच वाटते. मात्र या शब्दकोशातून मराठीतीलच अनेक शब्द आपण प्रथमच वाचत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी नोंदवल्या. जिथे-जिथे आपण प्रसारासाठी बैठक घेतली तेथे पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केवळ शब्दकोशाची विक्री म्हणजे आपल्यासाठी प्रतिसाद नाही. शब्दकोश आपल्याकडे हवा, असे पालकांना मनापासून वाटणे गरजेचे. तो मुलांप्रमाणेच त्यांनीही वाचणे गरजेचे. तसा प्रतिसाद पालक देत आहेत, हे आपल्यासाठी समाधानाचे आहे, असे प्रा. पटवर्धन यांनी सांगितले.व्याकरणाबाबतही माहितीअॅ आणि आॅ या दोन स्वरांचा मराठी स्वरांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासह अनेक प्रकारची उपयुक्त अशी माहिती या कोशामध्ये आहे. ही माहिती मराठी शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक, पालकांसाठी अधिक उपयुक्त ठरणारी आहे. त्याचा प्रसार करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
गिरीश पतके यांची एका कार्यक्रमात भेट झाली. त्यांनी शालेय मराठी शब्दकोश भेट म्हणून दिला. तो वाचल्यावर खूप प्रकर्षाने वाटले की, हा शब्दकोश घराघरात असायला हवा. प्रमाण मराठीचा आग्रह धरण्यासाठी प्रमाण मराठी कळायला हवी लोकांना. त्यामुळे त्यांच्याशी यावर बोलले. पुस्तक शाळाशाळांमध्ये, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू इच्छिते, हे समजल्यावर त्यांना आनंद झाला. त्यांनी मला जिल्हा समन्वयक म्हणून काम करण्याची सूचना केली आणि मी लगेचच शाळाशाळांमध्ये जायला सुरूवात केली.- प्रा. निधी पटवर्धनजिल्हा समन्वयक