खेड : तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायतींची लोकसंख्या ही दोन हजारपेक्षा अधिक असून, शासनाच्या नवीन धोरणानुसार सद्यस्थितीत चार गावांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करण्यासाठी येथील पंचायत समिती प्रशासन प्रयत्नशील आहे. तालुक्यातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती व स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने २१ ठिकाणी नवीन विलगीकरण कक्ष कार्यान्वित झाल्यास सुमारे ६२,६८९ लोकसंख्येला याचा फायदा मिळणार आहे.
या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात जवळपास ३० खासगी वैद्यकीय व्यावसायिक असून, सर्व २१ गावांमध्ये नवीन विलगीकरण कक्ष उभारण्यात प्रशासनाला यश मिळाले तर १,०८२ बेड ग्रामीण भागातील जनतेला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कळंबणी उपजिल्हा रुग्णालय, नगर परिषद कोविड केअर सेंटर व शिवतेज आरोग्य संस्थेचे कोविड केअर सेंटर अशा तीन ठिकाणी शासकीय खर्चाने कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. मात्र, भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ प्रदेशामुळे ग्रामीण भागातील जनतेला उपचारासाठी दाखल करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ग्रामीण भागातील जनतेला गावात किंवा जवळपास विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यासाठी तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे.
यामध्ये पहिल्या टप्प्यात भरणे, आंबडस, खारी-नांदगाव व सुसेरी ग्रामपंचायतींनी गावातच विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. भरणे ग्रामपंचायतीची जवळपास सहा हजार लोकसंख्या असून, येथील नवभारत हायस्कूलच्या इमारतीत ३० बेड क्षमता असलेले केंद्र उभारण्यात येणार आहे. आंबडस गावात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ३० बेडची क्षमता असलेले केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात येत असून, यासाठी आवश्यक पाणी, वीज व शौचालय, आदी सुविधा उपलब्ध आहेत. खारी-नांदगाव व सुसेरी येथील प्राथमिक शाळेत प्रत्येकी १६ बेडचे केंद्र लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत सुरू होत असलेल्या चार गावांमधील केंद्रांमुळे ९२ बेडची सुविधा निर्माण होणार आहे. या चार ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १३,४६४ लोकसंख्येला या केंद्रांचा उपयोग होणार आहे. तालुक्यातील अन्य १७ ग्रामपंचायतींची लोकसंख्या २ हजारपेक्षा जास्त असून, या गावांमध्येही स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये वेरळ, भोस्ते, शिव, सुकिवली, लोटे, आवाशी, लवेल, घाणेखुंट, खोपी, कळंबणी बुद्रुक, फुरुस, गुणदे, चिंचघर, भेलसई, अस्तान, धामणदेवी व भडगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.