रत्नागिरी : नियमबाह्य लसीकरण केल्याचा ठपका ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करुन उचित कार्यवाही करावी, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषदेला देण्यात आले आहे. त्यामुळे आठवडा बाजार येथील लसीकरण प्रकरणाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
आठवडा बाजार येथील एका मंगल कार्यालयात लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्याला राजकीय रंग देण्यात आला होता. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्याला भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. लसीकरण प्रशासनामार्फत राबवायचे असते. असे असतानाही शिवसेनेला लसीकरण करण्याचा कॅम्प कसा काय मिळू शकतो, असे बरेच मुद्दे भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांनी उपस्थित केले होते. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही दाखल केली होती. नियमबाह्य लसीकरण मोहीम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी करुन त्याबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबद्दल तक्रारदारांना परस्पर कळविण्यात यावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.