रत्नागिरी : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरील फवारणी पंपाची अनावश्यक खरेदी केल्याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असून, कृषी सचिवालयाकडून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. याच्या चौकशीसाठी पथक रत्नागिरीत येणार आहे. फवारणी पंपाबरोबरच पाच अश्वशक्तीचे ११९८ शेतीपंप तसेच रक्षक सापळ्यांचीही अनावश्यक खरेदी करण्यात आली होती. रक्षक सापळे व फवारणी पंप शेतकऱ्यांनी खरेदी न केल्याने अद्याप गोदामात पडून आहेत तर पाच अश्वशक्तीच्या ११९८ शेतीपंपाची आॅर्डर तत्कालीन कृषी अधीक्षकांनी दिली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. एकात्मिक भात उत्पादक कार्यक्रमांतर्गत भातपिकाच्या रक्षणासाठी ७५ हजार ६०० रक्षक सापळे मागविण्यात आले होते. त्यासाठी ८ लाख ३१ हजार ६०० रुपये खर्च करण्यात आले. मात्र, भात कापणीनंतर हे सापळे उपलब्ध झाल्यामुळे हे रक्षक सापळे अद्याप कृषीकार्यालयाच्या गोडावूनमध्येच पडून आहेत. पाच अश्वशक्तीच्या ११९८ शेतीपंपाची आॅर्डर कृषी कार्यालयाने दिली होती. मात्र, कृषी अधीक्षक आरिफ शहा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ती रद्द केली होती. तत्कालीन कृषी अधीक्षकांनी १०२३ फवारणी पंप मागविले होते. ‘एमईडीसी’ कंपनीकडून या पंपाचे वितरण करण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांनी हे पंप नाकारल्यामुळे तालुक्याच्या गोदामात हे पंप पडून आहेत. १०२३ पंपासाठी ७८ लाख ७७ हजार रूपये खर्च करण्यात आले. यापैकी ५० टक्के शासकीय अनुदान हे शेतकऱ्यांना मिळणार असले तरी ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार होती. ३९ लाख ३८ हजार ५०० रूपये शासकीय अनुदान कंपनीला जमा करण्यात आले आहे. पैकी शेतकरी वाट्याचे ३९ लाख ३८ हजार ५०० रूपये भरण्याचा तगादा कंपनीने कृषी विभागाकडे लावला होता. मात्र, कृषी अधीक्षक शहा यांनी रक्कम भरण्यास स्पष्ट नकार कळविला होता. या प्रकाराची कृषी सचिवालयाकडून चौकशी सुरू झाली आहे. आता याच्या चौकशीसाठी चौकशी पथक लवकरच रत्नागिरीत येणार आहे. (प्रतिनिधी)
पंप खरेदीची होणार लवकरच चौकशी
By admin | Published: June 19, 2016 12:54 AM