राजापूर : राजापूर-कोल्हापूर दरम्यान लगतचा मार्ग ठरणाऱ्या अणुस्कुरा घाटात १५ वर्षापूर्वी सुरु केलेला तपासणी नाका जिल्हा पोलीस दलाने अचानक बंद केल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे भविष्यात गुन्हेगारीत वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.अणुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरकडे जाणारा लगतचा मार्ग राजापुरातून सुरु झाला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विनय चौबे यांनी अणुस्कुरा घाटात पोलीस तपासणी नाका सुरु केला होता.मागील दीड दशकाच्या काळात राजापूर तालुका व लगतच्या भागात गुन्हे करत अणुस्कुरामार्गे पळणाऱ्या अनेक आरोपींना याच नाक्यामुळे जेरबंद करता आले होते. घाटमाथ्यावरुन कोकणात येणाऱ्या शिकाऱ्यांनादेखील पोलिसांनी तपासणी नाक्यावर ताब्यात घेऊन गुन्हे नोंदवले होते. अणुस्कुरा घाट हा धोकादायक आहे. काहीवेळा रात्री-अपरात्री अपघात घडल्यानंतर कारवली नाक्यावरील पोलीस तत्काळ घटनास्थळी धावून जात होते. त्यामुळे हे महत्त्वाचे तपासणी नाके जिल्हा पोलीस दलाने अचानक बंद केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मागील काही दिवस हे नाके बंद आहेत.नाके बंद करण्यात आल्याने याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे तपासणी नाके बंद झाल्याने गुन्हेगारांना अणुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरला पळून जाणे सहज शक्य होऊ शकते. त्यामुळे भविष्यात या परिसरात गुन्ह्यांमध्ये वाढ होईल, अशी भीती जनतेतून व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे बंद केलेले तपासणी नाके तत्काळ पूर्ववत सुरु करावे, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. अचानक बंद करण्यात आलेल्या या नाक्यांमुळे सध्या या मार्गावरून जनावरांची वाहतूक केली जात आहे. कारवली फाटा येथे गाडी घेऊन जायची व तेथे गाड्या भरायच्या, असे प्रकार सुरु आहेत. यामुळे करक, येरडव, कारवली, पांगरी आदी गावातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)नाराजी : कार्यालय हटवण्याचा घाट?अणुस्कुरा घाटातील हे पालीस चेकपोस्ट अचानक बंद करून ते पाचलमधील बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ सुरु करण्याचा घाट जिल्हा पोलीस प्रशासनाकडून घातला जात आहे. हे चेकपोस्ट अचानक हटवल्याने येथील सुरक्षेचा मुद्दा आता नव्याने ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.अणुस्कुरा घाटातील चेकपोस्टसाठी ग्रामस्थांना खूप मेहनत घ्यावी लागली होती. ते सुरु झाल्यानंतर आता जर ते बंद केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. यासाठी आम्हाला शासनाकडे दाद मागावी लागेल.-प्रकाश दसवंत,उपसरपंच, कारवलीशिकाऱ्यांना मोकळे रानपश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर शिकारी राजापुरात येतात. त्यांना या चेकपोस्टमुळे आळा बसत होता. मात्र, आता त्यांना मोकळे रान मिळणार आहे.
अणुस्कुरा घाटातील तपासणी नाका बंद
By admin | Published: January 27, 2016 11:56 PM