मंडणगड : तालुक्यातील दुष्काळाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीने तालुक्यातून निवडण्यात आलेल्या ११पैकी ३ कृषी मंडळ विभागातील ३ गावांचा प्रात्यक्षिक पाहणी दौरा केला. उर्वरित विविध गावांचा अभ्यास करून उपग्रहाचा अहवाल व वास्तवदर्शी स्थिती यांचा स्थळ पाहणी अहवाल तयार केला. या पाहणीचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.या समितीत तहसीलदार प्रशांत पानवेकर, तालुका कृषी अधिकारी मुरलीधर नागदिवे, पंचायत समिती विस्तार अधिकारी राजकुमार घावट, विशाल जाधव, मंडल कृषी अधिकारी डी. एन. जुवेकर कृषी सहाय्यक अधिकारी राहुल देशमुख, यांचा समावेश होता.गेल्या तीन आठवड्यात तालुक्यात पाऊस पडलेला नाही. १७ आॅक्टोबर २०१८अखेर मंडणगड तालुक्यात सरासरी ३५६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खरीपाच्या हंगामात कमी कालावधीच्या भातशेतीसाठी शेवटच्या टप्प्यात आवश्यक असणारा पाऊस न झाल्याने भातशेतीचे मोठे नुकसान होणार आहे.
कमी पर्जनमान्य व उपग्रहाच्या माध्यमातून झालेल्या अभ्यासात मंडणगड तालुका दुष्काळाच्या सावटाखाली येण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्य शासनाने या तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश केला आहे.राज्यातील विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यातील पर्जन्यमानाची स्थिती लक्षात घेता राज्य शासनाने आॅक्टोबर महिन्यातच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. मंडणगड तालुका स्टेज वनवरून, स्टेज टूमध्ये जाणार का? यासंदर्भातील चित्र आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्पष्ट होणार आहे.स्थळपाहणी करताना तालुक्यातून निवडण्यात आलेल्या ११ गावांतील पिकाच्या नुकसानाचे फोटो आणि माहिती माबोईलवरील अॅपमध्ये अपलोड केली जाणार आहे. स्थळपाहणी अहवालात सॅटेलाईट सर्वेक्षण व वास्तवदर्शी स्थिती यांची पडताळणी होणार आहे. यात नुकसानाची तीव्रता निश्चित केली जाणार आहे.दरम्यान, यादीत समाविष्ट असलेल्या परंतु कापणी पूर्ण झालेल्या गावांचा समावेश या तपासणीत करण्यात येणारा नसून, पर्यायी गावांचा या यादीत समावेश करुन त्या गावाची तपासणी केली जाण्याचे संकेतही मिळाले आहेत.
दरम्यान, पाऊस नसला तरी दररोज पडणाऱ्या दवामुळे १२० दिवसांपर्यंतची कमी कालावधीची भातशेती तग धरू शकते. तालुक्यातील अडखळवण, कुडूक खुर्द, गोवले, उंबरशेत, आतले, आंबवणे खुर्द, साखरी, कुडूक बुद्रूक, कादवण, घराडी, माहू या गावांचा समावेश आहे.