रत्नागिरी : येत्या पावसाळ्यात कोकण रेल्वेची वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी. वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या उपस्थितीत रेल्वे सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोकण रेल्वे मार्गाची सीआरएस वाहनामार्फत प्रत्यक्ष तपासणी केली. रत्नागिरी विभागातील मार्ग तपासणीवेळी रत्नागिरीचे क्षेत्रीय प्रबंधक उपेंद्र शेंड्ये तसेच अन्य अधिकारीही उपस्थित होते.कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकातील गैरसोयींबाबत लोकमतने प्रकाशझोत टाकला होता. या वृत्ताची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी या गैरसोयींबाबतदेखील पाहणी करण्यात आली. रेल्वे मार्गाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी कोकण रेल्वेचे सीआरएस वाहन दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाले.
त्यानंतर स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅक जोडणी करणे, आणीबाणीच्या वेळी करावयाच्या उपाययोजनेबाबतची प्रात्यक्षिके कर्मचाऱ्यांनी सादर केली. सुमारे ४०पेक्षा अधिक कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी कामगारांना पावसाळ्यात घ्यावयाच्या सावधानतेबाबत मार्गदर्शन केले.रत्नागिरीतून ट्रॅक तपासणी वाहन दुपारी ४ वाजता मडगावला रवाना झाले. यावेळी मार्गावरील विविध बोगदे, पूल, कटिंग्ज यांची पाहणी आणि तपासणी तांत्रिक अधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
तपासणी पथक येणार असल्याने मार्गावर व सर्व रेल्वे स्थानकांवर स्वच्छता ठेवण्यात आली होती. तसेच प्रवाशांसाठी असलेल्या सुविधाही योग्यरित्या कार्यरत राहतील, याची काळजी घेण्यात आली होती.सीआरएस वाहनाने पाहणीदरवर्षी कोकण रेल्वेकडून पावसाळ्याआधी रेल्वेमार्गाची तपासणी केली जाते. त्याचा फायदा पावसाळी रेल्वे प्रवास सुरक्षित होण्याकरिता नक्कीच होत आहे. यावेळीही १२ एप्रिलला कोकण रेल्वे मार्गाची सीआरएस वाहनाद्वारे अधिकाऱ्यांकडून पावसाळी तपासणी होणार आहे. पावसाळी धोक्याचा आढावा घेऊन त्यानुसार सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.