लाेकमत न्यूज नेटवर्क
आबलोली : जिल्ह्यात लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, आबलाेली बाजारपेठेत किरकाेळ कारण सांगून फिरणाऱ्या वाहनचालक, नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवरसुद्धा कारवाई सुरू करण्यात आली आहे. दंड वसुलीसह अनेकांची प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोली येथे कोरोना चाचणी करण्यात आली.
गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठ ही परिसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती बाजारपेठ आहे. याठिकाणी वैद्यकीय सेवा, बॅंक, जीवनावश्यक वस्तू खरेदी आदी कामांसाठी नागरिक गर्दी करतात. मात्र, सध्या टाळेबंदी असल्याने मेडिकलवगळता सर्व अत्यावश्यक सेवा, बॅंका बंद राहणार आहेत. तरीसुद्धा विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच बाजारपेठेत अनावश्यक फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सरपंच तुकाराम पागडे, पोलीसपाटील महेश भाटकर, पोलीस काॅन्स्टेबल संदीप शिंदे आणि सहकारी यांच्यासह ग्राम कृती दल सदस्यांनी याकामी पुढाकार घेतला होता. वाहनचालक, नागरिक यांनी बाजारपेठेत अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीसपाटील यांनी केले आहे़
---------------------------
गुहागर तालुक्यातील आबलाेली बाजारपेठेत लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.