अडरे : चिपळूण शहरात महापुराच्या संकाटामुळे अनेक ठिकाणी प्लास्टिक कचरा तसेच मदत म्हणून आलेल्या लाखो प्लास्टिकच्या पाणी बॉटल्स यांचा योग्य निचरा होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून आकार फाऊंडेशन व हेल्प फाऊंडेशन चिपळूण यांच्या सहयोगातून चिपळूण शहरातील प्लास्टिकचा कचरा व प्लास्टिक बॉटल गोळा करण्याचा उपक्रम सुरू झाला आहे.
यासाठी चिपळूण नगर परिषद प्रशासनाचे सहकार्य लाभले. या प्लास्टिकच्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. हा कचरा गोळा केला जात असून, कचरा वेचक महिला आपल्या शहरात फिरत आहेत, त्या जेव्हा आपल्या प्रभागात येऊन आवाहन करत असतील तेव्हा आपण आपल्या घरातील सर्व प्लास्टिकचा कचरा एकत्रित करून शक्यतो गोणीमध्ये बांधून या महिलांकडे द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आपण लवकरात लवकर प्लास्टिक कचरामुक्त शहर करावयाचे आहे, यासाठी सर्वांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे आहे, असे आवाहन हेल्प फाऊंडेशन चिपळूणचे अध्यक्ष सतीश कदम यांनी शहरवासीयांना केले आहे.