- चिपळूण व्यापारी महासंघटना आक्रमक
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महापुराला दोन महिने उलटत असताना, अद्याप एक दमडीही नुकसान भरपाई किंवा शासनाची मदत न मिळाल्याने चिपळुणातील व्यापारी आक्रमक बनले आहेत. आमच्या संयमाचा अंत पाहू नये, आमदार शेखर निकम यांच्या शब्दाखातर आंदोलन पुढे ढकलत आहोत. मात्र, पुढील ८ दिवसात शासकीय मदत मिळाली नाही, तर संपूर्ण बाजारपेठ बंद करून थेट रस्त्यावर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा एकमुखी निर्णय बुधवारी घेतलेल्या व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
शहरातील सावरकर सभागृह येथे चिपळूण व्यापारी महासंघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष शिरीष काटकर, कार्याध्यक्ष किशोर रेडीज, सचिव उदय ओतरी, ज्येष्ठ व्यापारी बापू काणे, अरुण भोजने, श्रीराम रेडीज, शमशुद्दीन सनगे, शैलेश वरवाटकर, पंकज तांबट, कविता पाथरे, लियाकत शहा, मिलिंद कापडी, स्वाती भोजने, प्रणिता धामणस्कर, हेमंत शिरगावकर यांच्यासह सर्व सदस्य व सुमारे अडीचशे व्यापारी उपस्थित होते.
शासनाने व्यापाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. मात्र, दोन महिने होत आले तरी मदतीचा पत्ता नाही. याबाबत सर्व व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. प्रत्यक्षात ५० हजार ही तुटपुंजी मदत आहे. तरीही ती योग्यवेळी मिळाली असती, तर व्यापाऱ्यांना काहीसा आधार मिळाला असता. परंतु, सरकार आणि शासकीय यंत्रणेने व्यापाऱ्यांची योग्य ती काळजी घेतलीच नाही, असे काहींनी स्पष्ट केले. तसेच विमा कंपन्याही अडवणूक करत आहेत. अनेक निकष समोर ठेवले जात आहेत. त्यांच्या अटी, शर्ती पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या निकषात शिथिलता मिळावी, त्यासाठी निवेदन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचबरोबर बँक प्रतिनिधींची भेट घेऊन पूरग्रस्त व्यापाऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी व्यापारी संघटनेतर्फे करण्यात येणार आहे. संबंधित विभागाने सतर्कतेचा इशारा देऊनही चिपळूण नगरपरिषदेने तसेच संबंधित यंत्रणेने व्यापाऱ्यांना सतर्क केले नाही, अशा अधिकाऱ्यांच्या निषेधाचा ठरावही यावेळी पारित करण्यात आला.
यावेळी आमदार शेखर निकम यांनी, शासकीय मदत आठवडाभरात व्यापाऱ्यांना मिळेल, त्यासाठी पाठपुरावा करत असून, वरिष्ठ पातळीवरही तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलनासारखे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले. त्यांच्या शब्दाला मान देत आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय व्यापारी महासंघटनेने घेतला आहे.