रत्नागिरी : चांगले क्रिकेटपटू तयार करायचे असतील, तर त्यासाठी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांसारखे व्यासपीठ खूप गरजेचे आहे. केवळ सराव करून पुढे जाता येत नाही. त्यासाठी स्पर्धा महत्त्वाच्या असतात, असे उद्गार रणजीपटू अजित सावंत यांनी काढले. येथील कै. छोटू देसाई क्रिकेट अकादमीतर्फे छत्रपती शिवाजी स्टेडियमवर घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
माजी कसोटीपटू सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, अशोक मंकड यांच्यासमवेत रणजी खेळलेल्या अजित सावंत यांनी लेग स्पिन गोलंदाजी करताना मुंबई संघाला रणजी ट्रॉफी अजिंक्यपद मिळवून देताना गोलंदाजीमध्ये सातत्य दाखविले होते. त्यावेळी भारतात एकापेक्षा एक फिरकी गोलंदाज असल्याने कोटा पद्धतीमुळे त्यांची भारतीय संघात निवड होऊ शकली नाही. अजित सावंत यांनी अकादमीतील खेळाडूंना फिरकी गोलंदाजीच्या शैलीबाबत मार्गदर्शन करताना चेंडूची उंची, टप्प्यातील बदल, लाईन अँड लेंग्थ, फॉलो थ्रो, क्रीजचा वापर कसा करावा व गोलंदाजीमध्ये वैविध्य ठेवताना गुगलीवर फलंदाज कसा बाद करावा, याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले.
अकादमीचे सल्लागार सचिन थरवळ यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सत्कारावेळी अकादमीच्या खेळाडूंशी प्रशंसा करताना उत्तम क्रिकेटपटू तयार होण्यासाठी रत्नागिरीत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांची दालने खुली होणे आवश्यक असल्याचे सावंत यांनी सांगितले. याप्रसंगी अकादमीचे सचिव दीपक देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात खेळाडूंनी त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणे जास्त आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी बीसीएचे कोच बाबा चव्हाण व प्रशिक्षक राजू सावंत तसेच खेळाडू व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून हे शिबिर घेण्यात आले.