रत्नागिरी : रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी गाेळप येथे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या भेटीने शेतकरीही भारावून गेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात भाताचे उत्पादन वाढले पाहिजे याकरिता भातासाठी वाढीव हमी भाव दिला आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही भाताचे लागवडीखालील क्षेत्र वाढून जादा पिकणारे भात खरेदी-विक्री संघ विकत घेणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती या वेळी बाळ माने यांनी शेतकऱ्यांना दिली. रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक बावा साळवी, प्रगतशील शेतकरी मंगेश साळवी, माजी सरपंच उमंग साळवी यांच्यासह किरण घाणेकर, महादेव बेंद्रे, सुनील आंबेकर, कमलाकर जोशी, रुपेश तेरवणकर, संजय आंबेकर, विश्वास घाणेकर, विलास घाणेकर, रूपेश गार्डी, संजय राड्ये आदी उपस्थित होते.
त्यानंतर गोळप गावातील प्रगतशील शेतकरी भगवान गुरव यांच्या प्रक्षेत्रालाही माने यांनी भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थ अविनाश गुरव, मंगेश गुरव, नंदकुमार गुरव उपस्थित होते. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये भात पिकावर वैविध्यपूर्ण संशोधन केले जाते. त्यामुळे या केंद्राला गोळप गावातील २५ शेतकऱ्यांची सहल आयोजित करूया, त्यातून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती मिळेल आणि भातशेतीकडे उत्पन्नाच्या दृष्टीने शेतकरी पाहू लागेल, असा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि विक्रमी भात उत्पादन करून त्याची विक्री झाली पाहिजे या हेतूने माने यांनी या वेळी चर्चा केली.