लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पारंपरिक पद्धतीने भात, पालेभाज्या, केळी, फुलांचे उत्पादन घेत असतानाच प्रयोगशील शेतकरी श्रीकृष्ण गुणे त्यांचे सुपुत्र अनिरुद्ध यांनी शेतीमध्ये अभिनव प्रयोग करण्याचे निश्चित केले. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होते, शिवाय पाण्याचा किमान वापर यामुळे बांबू शेती करण्याचे निश्चित केले. पाच एकर क्षेत्रावर त्यांनी साडेचार हजार बांबूची बेटे लावली आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी त्यांनी घन लागवड केली आहे. दोन वर्षांत उत्पादन सुरू होणार आहे.
बांबूची मुळे दीड ते दोन फुटांपेक्षा खाली जात नाहीत. शिवाय ४० ते ४५ वर्षांनी लागवड काढायची म्हटली तर कडेपासून काढता येते. बांबूच्या पानांचा खच अधिक पडतो, छोट्या आकाराची पाने लवकर कुजतात, त्यामुळे जमीन सुपीक बनते. एक बांबू कापला तर दोन बांबू उगवतात. त्यामुळे बांबूची शेती फायदेशीर ठरते. पहिल्या वर्षी किमान दीड लाख उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कमी पाण्यात होणारे पीक असून, उत्पादनासाठी फारसा खर्चही येत नाही. बांबूची बेटे वाढत असताना दाट वाढतात. त्यामुळे बांबू वाढल्यानंतर सावली निर्माण होते; परंतु बांबू लहान असताना आंतरपीक घेणे शक्य होते. अनिरुद्ध यांनी बांबू लहान असताना सलग दोन वर्षे कोहळ्याची आंतरलागवड करून उत्पादन मिळविले. एक टन उत्पन्न वर्षाला प्राप्त झाले. कोहळा पिकासाठी वन्यप्राण्याचा त्रास होत नाही. शिवाय लवकर खराब होणारे फळ नसल्याने दर आल्यानंतर विकणे सोपे होते. मिठाई विक्रेत्यांकडे कोहळ्यासाठी विशेष मागणी होते. आता बांबू मोठे झाले असून, बेटांची दाट वाढ झाली असल्याने यापुढे आंतरपीक शक्य नाही. शिवाय दोन वर्षांनंतर बांबू काढणी सुरू होणार आहे.
खर्चिक शेतीला फाटा
गुणे कुटुंबीय भातासह भाजीपाला, फुले, केळी, कलिंगडासह विविध प्रकारची पिके घेत असत. शेतीसाठी वन्यप्राण्यांचा त्रास तर होतो, शिवाय हवामानावर आधारित शेती असल्याने उत्पादन खर्चही अधिक येतो. त्यामुळे खर्चिक शेतीला फाटा देत असताना आधुनिक शेतीकडे वळण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांनी अभ्यास करून बांबूची लागवड केली.
कमी श्रम, कमी पाणी
बांबूची मुळे दीड ते दोन फुटांपेक्षा खाली जात नाहीत. त्याशिवाय बांबूसाठी पाणी जास्त लागत नाही. लागवडीनंतर देखभालीचाही खर्च फारसा येत नसल्याने बांबू शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. अन्य उत्पादनापेक्षा बांबू शेतीसाठी कमी श्रम व कमी पाण्याचा वापर होतो. त्यामुळेच पाच एकर विस्तीर्ण क्षेत्रावर बांबू लागवड केली आहे.
दोन वर्षांत उत्पादन सुरू
बांबू लागवडीला साडेतीन वर्षे पूर्ण झाली असून, येत्या दोन वर्षांत बांबूची तोड सुरू होणार आहे. एक बांबू कापल्यावर दोन बांबू फुटत असल्याने बांबूची शेती फायदेशीर ठरत आहे. बांधकाम, लाकूड व्यावसायिकांकडून बांबूला मागणी होत आहे. पहिल्या वर्षी किमान दीड लाखाचे उत्पन्न प्राप्त होण्याची शक्यता आहे. बांबूला दर चांगला प्राप्त तर होतोच शिवाय मागणीही असल्याने बांबू शेतीसाठी गुणे कुटुंबीयांनी प्राधान्य दिले आहे.
पाच महिन्यांत उत्पन्न
जास्त पाण्यामुळे कोहळा कुजतो. त्यामुळे जानेवारीत लागवड केलेला कोहळा मेमध्ये तयार झाला. एक टन कोहळा उत्पादन मिळाले आहे. मिठाई व्यावसायिकांकडून कोहळ्यासाठी मागणी होत आहे. वन्यप्राण्यांचा त्रास होत नसल्याने कोहळा पीक फायदेशीर ठरत आहे. आंतरपिकातून त्यांना चांगले उत्पादन प्राप्त झाले आहे.
कोहळा लागवड
बांबू रोपे लावल्यानंतर आंतरपीक घेण्यासाठी गुणे यांनी अभ्यासपूर्वक कोहळ्याची निवड केली. त्यासाठी त्यांनी स्वत:च रोपे तयार करून लागवड केली. नाशवंत फळ नसल्याने विकण्याची घाई करावी लागत नाही. साठवणूक करून दर आल्यानंतर विक्री सुलभ होते.