सक्शन पंपावर कारवाई
मंडणगड : तालुक्यातील म्हाप्रळ येथे सक्शन पंप असल्याची माहिती प्राप्त होताचे तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, मंडण व देव्हारेचे सर्कल प्रवीण मोरे, सर्कल गजानन खामकर, तलाठी प्रवीण आदक, शरद पाटील, कोतवाल स्वप्निल पवार यांच्या टीमने वेसवी परिसरातून खाडी मार्गे गस्त घालत खाजणात सापडलेले दोन सक्शन पंप पाण्यात बुडविले आहेत.
कोविड केंद्राची पाहणी
रत्नागिरी : शहरातील एमआयडीसीतील गद्रे मरीन कंपनी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कामगारांसाठी कोरोना केंद्र उभारले आहे. या केंद्रात साठ रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था केली आहे. या केंद्रास जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.
कोरोना योध्द्यांचा सत्कार
खेड : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र या साहित्यिक संस्थेतर्फे गेले एक वर्ष आपला जीव धोक्यात घालून कोरोना महामारीत योध्द्यांप्रमाणे काम करणाऱ्या ५५ जणांचा सत्कार करण्यात आला.
पाणलोट योजना संकटात
रत्नागिरी : एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातंर्गत विविध योजनांचा निधी प्रलंबित असल्याने पाणलोटची योजना संकटात आली आहे. त्यामुळे आता पाणीटंचाईच्या काळात या योजना बंद होण्याची भीती आहे.
पीक धोक्यात
रत्नागिरी : बदलत्या हवामानामुळे आंबा, काजू, फणस, आदी पिके धोक्यात आली आहेत. शिवाय रामफळासही फटका बसत आहे. तीव्र उष्म्यामुळे फळांवर डाग पडत आहेत. कोकणात उत्पादन कमी असले तरी आहे त्या उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे.
आरोग्य तपासणी
रत्नागिरी : माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहीम भालावली येथे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत गावातील खालचा भंडारवाडा येथील ८८ कुटुंबांची तपासणी पथकाद्वारे करण्यात आली.
पाणीपुरवठा
खेड : तालुक्यातील संगलट येथील वाड्यांना दीड महिना कालावधीसाठी मातोश्री ट्रस्टतर्फे टॅंकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या योजनेचा प्रारंभ नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
वनपाल मुल्ला रुजू
देवरूख : संगमेश्वर तालुका वनपाल म्हणून ताैफिक मुल्ला यांनी कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी मुल्ला यांनी देवरूख येथे वनरक्षक म्हणून सेवा बजावली होती. त्यानंतर त्यांना बढती मिळून ते खेड येथे कार्यरत होते.
परवाना विभाग बंद
रत्नागिरी : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परवाना विभाग दि. १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.
आंबा विक्रीची पर्यायी सुविधा
रत्नागिरी: आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पणन मंडळाने राज्यांतर्गत आंबा विक्रीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.