रत्नागिरी : वाजत गाजत विठोबा माऊलीच्या तालसुरात निघालेली ग्रंथ दिंडी... छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांच्यातील नातेसंबंधावर आधारीत ’स्वराज्य निष्ठा’ नाटीका, लावणी, भारूड, किर्तन सारखे लोककला, दिप नृत्य, मॉरीशसमधील तरूणानी सादर केलेले भन्नाट जाखडी नृत्य, मान्यवर साहित्यीकांचे विचार, काव्य संमेलन, पुस्तक प्रदर्शन, अशा भरगच्च साहित्यिक मेजवानीने समृध्द १७ वे आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलन मॉरीशस येथे जल्लोषात पार पडले. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मराठी स्पिकींग युनियन मॉरीशस अंतर्गत मॉरीशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरीशस मराठी कल्चर सेंट्रल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित १७ वे आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलन मॉरीशस येथे पार पडले. या संमेलनासाठी महाराष्ट्रातून १०० साहित्यप्रेमी मॉरीशसला गेले होते.मॉरीशसमधील मराठी भाषिकांची पाचवी पिढी आता तेथे राहत आहे. शैक्षणिक, साहित्य, राजकारण, शासकीय सेवा अशा विविध ठिकाणी तेथे मराठी माणूस काम पाहत आहे. सातासमुद्रापार अनेक पिढ्या महाराष्ट्रापासून दूर राहूनही मराठी मातीशी असलेल्या ओढीने मॉरीशसमध्ये मराठी साहित्य संमेलन घेऊन आपली संस्कृती, नाते जपण्याचा प्रयत्न मॉरीशसमधील मराठी भाषिक करीत आहेत.मराठी भाषा जतन करायची जबाबदारी केवळ सरकारची नसून ती आपल्या सगळ्यांची आहे. सध्या मराठी भाषेत बरेच अमराठी शब्द घुसले आहेत, मराठीला लागलेले हे अमराठी वळण थांबवण्याची गरज जेष्ठ पत्रकार, संपादक, लेखक विजय कुवळेकर यानी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.यावेळी भारतीय सांस्कृतिक वारसा परिषद अध्यक्ष माजी खासदार विनय सहस्त्रबुध्दे, मॉरीशसच्या भारतीय दुतावासाच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरीशस सरकारमधील हौसिंग तसेच लॅन्ड ट्रान्सपोर्ट व लाईट रेल्वे मंत्री ऑलन गानू, कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्षा नमिता किर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, मॉरीशस मराठी स्पिकींग युनियन अध्यक्ष नितीन बाप्पू, स्वागताध्यक्ष मॉरीशसच्या निशा हिरू, संमेलनाचे निमंत्रक आमदार संजय केळकर उपस्थित होते. संमेलनाच्या समारोपापूर्वी मॉरीशसमधील मराठा मंडळाच्या ३० तरूणांनी कोकणातील पारंपरिक जाखडी नृत्याचे सादर केले. जयू भाटकर यानी या मॉरीशस तरूण मंडळींचे जाखडी नृत्य रत्नागिरीत करूया असे सांगताना कोमसापचे विश्वस्त रमेश कीर यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.संमेलनात सहभागी झालेल्या तीनही मंडळांच्या प्रतिनिधी व सदस्याना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण देऊन कोमसापने आधुनिक कवीतेचे जनक कवी केशवसुत यांच्या जन्मगावी मालगुंड येथे जे देखणे स्मारक उभारले आहे, त्याला आवर्जून भेट देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अध्यक्षा नमिता किर यानी यावेळी विविध ठरावांचे वाचन केले. यात प्रामुख्याने मराठी भाषा विभागाने कायमस्वरूपी ग्रंथ संग्रहालयाचे आयोजन मॉरीशसला करावे, कलागुणांचे दर्शन घडवणारा मॉरीशसमहोत्सव महाराष्ट्रात तर मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा महोत्सव मॉरीशसध्ये आयोजित करावा, मराठी भाषा संवर्धन व प्रसारसाठी शिखर परिषद मुंबईत आयोजित करावी, लेखक कै. प्र, शी. नेरूरकर व जेष्ठ संपादक माधव गडकरी यांचे तैलचित्र मॉरीशस संसद भवनात लावावे असे प्रस्ताव संमेलनात बहुमताने संमत झाले. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे मॉरीशसमधील ग्रंथालयासाठी ५०० पुस्तके यावेळी सदस्यानी भेट स्वरूपात दिली.
मॉरीशसमध्ये पार पडले आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलन; 'स्वराज्य निष्ठा’ नाटिका, लावणी, किर्तनासह भरगच्च साहित्यिक मेजवानी
By मेहरून नाकाडे | Published: December 11, 2023 3:50 PM