रत्नागिरी : शहरातील बड्या रुग्णालयांमध्ये कोरोना उपचारासाठी अधिक पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच २८ खासगी कोरोना रुग्णालयांची तपासणी करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या.रत्नागिरीतील नव्याने उभारण्यात आलेल्या नव्या बड्या खासगी रुग्णालयाबद्दल आपल्याकडे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तक्रारी येत असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
तसेच इतर खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनाग्रस्त रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असल्याच्या तक्रारी पत्रकारांनीही यावेळी मांडल्या. नव्या बड्या रुग्णालयामध्ये प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे यावेळी सामंत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी सामंत यांनी या रुग्णालयाबरोबरच जिल्ह्यातील खासगी कोरोना रुग्णालयांचे सर्वेक्षण करा, असे सांगितले.ते म्हणाले की, रुग्णांकडून जादा पैसे घेणे तसेच प्रशिक्षित नसलेल्या कर्मचाऱ्यांना काम करण्यास देणे, या बाबी गंभीर आहेत. सप्टेंबर महिन्यापासून या रुग्णालयाबद्दल तक्रारी येत आहेत. त्यामुळे या रुग्णालयाची चौकशी आधीच करणे गरजेचे होते. या जनता दरबारातही अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची आपण गंभीर दखल घेतली असून त्याची पूर्ण चौकशी करणार असल्याचे सामंत यांनी संगितले.