आॅनलाईन लोकमत
राजापूर : ग्राहकांकडून फसवणुकीच्या दाखल झालेल्या तक्रारीवरुन राजापूर पोलीसांनी शहरातील एका गुंतवणूक करणाऱ्या कंपनीची चौकशी सुरु केली असून अशा कंपनीत आपली गुंतवणूक करताना ग्राहकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी केले आहे .राजापूर शहरात आर्थिक गुंतवणूक करुन नंतर मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले असून त्यामधून तालुकावासियांची फसवणूक झाल्याचे प्रकार अनेकवेळा उघडकीस आले असतानादेखील मागील काही दिवसांपासून राजापूर शहरात नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या एका कंपनीने आपले कार्यालय थाटून गुंतवणुकीला सुरवात केली आहे. यामध्ये अनेकांनी आपापली गुंतवणुक केली असून संबंधित कंपनीकडून फसवणुकीचे प्रकार घडल्याने अनेक गुंतवणुकदारांनी थेट पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत.या कंपनीचे रजिस्ट्रेशन मुंबईतील असून तिचे राजापुरात कार्यालय थाटण्यात आले आहे. काही स्थानिक मंडळींना कामावर ठेवण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून ग्राहक निवडून आर्थिक गुंतवणूक केली जात आहे, असेही पोलीसांच्या निदर्शनाला आले आहे. ग्राहकांकडून फसवणुकीच्या तक्रारी झाल्याने तालुकावासीयांनी अशा कंपनीत गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.मागील अनेक वर्षात राजापूर शहरासह तालुक्याच्या विविध भागात अनेक कंपन्यांनी विविध नावाखाली जनतेला चुना लावला असून आणखी एका कंपनीने गुंतवणुकीच्या नावाखाली शहरात फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन राजापूर पोलीसांनी चौकशीला सुरवात केली आहे. दरम्यान राजापूर पोलीसांनी त्या फसवणूकप्रकरणी तपास सुरु केला असून संबंधीतांची चौकशी सुरु केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी दिली. संबंधीत कंपनीत गुंतवणुक करणाऱ्या नागरिकांच्या आणखी तक्रारी आल्यास त्यादेखील नोंदविल्या जाणार आहेत.(प्रतिनिधी)