रत्नागिरी : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहिमेला वेग आला असून या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृहभेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत १ लाख २४ हजार ७१ जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले असून यात नव्याने ८५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील २४ जणांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पेतून आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी डाॅ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ७१० पथकांनी तपासणी कामाला सुरुवात केली होती. सध्या ११३३ पथके घरोघरी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. तसेच त्यांची संपूर्ण माहिती घेत आहेत.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ३५ हजार ३३८ घरांना भेटी देण्यात आल्या. यातून एकूण ४३ हजार ९०२ कुटुंबातील १ लाख २४ हजार ७१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या भेटीदरम्यान नागरिकांची ऑक्सिमीटरवर ऑक्सिजन पातळी तपासण्यासह त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे तसेच सहा मिनिटांची वॉक टेस्ट घेणे आदी तपासण्यांचा समावेश आहे. या तपासणी दरम्यान ४,८८९ घरे बंद असल्याचे निदर्शनास आले. चालण्याच्या तपासणीनंतर ज्यांच्या ऑक्सिजनची पातळी ९५ पेक्षा खाली गेली, अशांची संख्या शंभर आढळली आहे तर ताप,सर्दी, खोकला असणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या ३२९ इतकी होती.
माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी
नियुक्त पथके : ११३३
सर्वेक्षण केलेली लोकसंख्या : १,२४,०७१
सर्वेक्षण केलेली घरे : ३५,२३८
तपासणी केलेली कुटुंबे : ४३,९०२
तापमान घेतलेल्या व्यक्तींची संख्या : १,१८,०९६
वाॅक टेस्ट केलेल्या व्यक्ती : ५६,३९६
ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी : १००
ताप, सर्दी, खोकला असलेले : ३२९
वासाची जाणीव नसलेले : ५५
बाधित व्यक्ती : ८५
खासगी रुग्णालयात उपचार घेणारे : ६०
शासकीय रूग्णालयात उपचार घेणारे : २५१
कोविड सेंटरमध्ये दाखल : २४
बंद असलेली घरे : ४८८९