रत्नागिरी : मुरूड (ता. दापाेली) येथील साई रिसाॅर्ट बांधकामप्रकरणी सुरू असलेल्या तपासात कथित मनी लाॅंड्रिंगचा प्रकार समाेर आल्याचे ईडीने म्हटले आहे. याप्रकरणी ईडीने साेमवारी (८ मे) सदानंद कदम आणि माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांच्यावर विशेष न्यायालयात आराेपपत्र दाखल केले आहे.सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून साई रिसाॅर्ट बांधण्यात आल्याचा आराेप करण्यात आला हाेता. केंद्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांची चौकशी केली होती. पर्यावरण (संरक्षण) कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने दाखल केलेल्या तक्रारीमुळे मनी लाँड्रिंगचे प्रकरण समाेर आले आहे.त्यानंतर जानेवारीमध्ये ईडीने परब आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून, दापोली येथील साई रिसॉर्ट जप्त केले होते, ज्याची किंमत १० कोटींहून अधिक आहे. परब यांनी कदम यांच्याशी मिळून स्थानिक उपविभागीय कार्यालयाकडून केवळ कृषी जमिनीचे अकृषिक वापरासाठी रूपांतरित करण्यासाठी बेकायदेशीर परवानगी घेतली आणि सीआरझेडचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधले, असे ईडीने म्हटले आहे.जमिनीचा वापर कृषीवरून बिगरशेतीमध्ये बदलण्याची परवानगी मिळवण्यासाठी कदम यांनी त्याच्या पूर्वीच्या मालकाची बनावट स्वाक्षरी केली, असाही आराेप केला आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत गुन्ह्यांचे एकूण उत्पन्न १०.२ कोटी रुपये होते, असे आराेपपत्रात म्हटले आहे.
परब यांना दिलासा?आराेपपत्रात अनिल परब यांचे नाव नाही. आराेपपत्रात त्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने त्यांना ईडीने दिलासा दिला आहे का, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.