चिपळूण : तालुक्यातील कळकवणे राजवाडा येथील दोन शाळकरी मुलींच्या मृत्यूचे गूढ अधिक वाढले आहे. याप्रकरणी पाेलिसांनी शाळेतील शिक्षकांची रविवारी चाैकशी केली. ज्या परिस्थितीत या दाेघींचे मृतदेह आढळले आहेत, त्यावरून घातपाताचा संशय व्यक्त हाेत असून, पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, मृतदेहांवर तसेच शरीरावर भाजलेल्या अवस्थेतील खुणा आढळल्याने या खुणा कसल्या आहेत, याचा शाेध सुरू आहे.सोनाली राजेंद्र निकम (१५) आणि मधुरा लवेश जाधव (१५, दाेघीही रा. कादवड, कातळवाडी, चिपळूण) नववीमध्ये शिकत हाेत्या. शनिवारी दुपारी त्या येथील वैतरणा नदीकिनारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, काही वेळातच त्या दाेघींचे मृतदेह नदीकिनारी तरंगताना दिसले. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दाेघींना नदीच्या पाण्यातून बाहेर काढले.मधुरा जाधव हिचा जागीच मृत्यू झाला हाेता, तर साेनाली निकम हिचा श्वासाेच्छ्वास सुरू हाेता. तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तिला रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शिरगाव अलोरे पोलिस स्थानकाचे पाेलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दाेघींचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दाेघींचे मृतदेह नदीत न सापडता नदीकिनारी सापडल्याने ही आत्महत्या नसावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, तसेच मारहाण झाल्याच्या कोणत्याही खुणा दाेघींच्या शरीरावर नसल्याने अत्याचार झालेला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दाेघींना उष्माघाताचा अटॅक आला असावा का, याचाही शाेध घेतला जात आहे. त्या दाेघी ज्या शाळेत शिकत आहेत, त्या शाळेतील शिक्षकांची रविवारी चौकशी करण्यात आली. रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे एक पथक दिवसभर तपासात गुंतले आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती समाेर येणार आहे. पोलिसांनी मात्र या संपूर्ण प्रकरणात मौन बाळगले आहे.
शरीरावरील जखमा कसल्या?मृतदेहांच्या शरीरावर काही जखमा आढळल्या आहेत. त्यावरून प्राथमिक अंदाजानुसार घातपाताचा संशय व्यक्त हाेत आहे. त्या खडकावर पडलेल्या आढळल्याने त्या जखमा तापलेल्या खडकाच्या आहेत का, याचा शाेध पाेलिस घेत आहेत.