साखरपा : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने रुग्णांना बेडची कमतरता भासू लागली. त्यातच साखरपा परिसरातील रुग्णांना देवरुख व रत्नागिरीशिवाय पर्याय नव्हता. यासाठी संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे आयसोलेशन सेंटर सुरू होणार असून, यासाठी संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सर्व डॉक्टरांशी चर्चा करून या ठिकाणी सेंटर चालू करणार असल्याचे सूतोवाच केले असून, येत्या चार-पाच दिवसांतच हे सेंटर सुरू होईल, असे अपेक्षित आहे.
ज्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, अशा पॉझिटिव्ह रुग्णांना या ठिकाणी दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे. मात्र, ज्या रुग्णांना रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचा त्रास, ऑक्सिजनची घटलेली पातळी असे त्रास असतील अशा पॉझिटिव्ह रुग्णांना देवरुख व रत्नागिरी येथे सेवा देण्यात येणार आहे.
चौकट
खासगी डॉक्टर्सचा सहभाग
साखरपा येथे सुरू होणाऱ्या आयसोलेशन सेंटरमध्ये साखरपा परिसरातील सर्व खासगी डॉक्टर विनामोबदला सेवा देण्यास तयार असून, त्यांच्या या निर्णयामुळे साखरपा प्राथमिक आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. यासाठी सभापती जयसिंग माने यांनी सर्व डॉक्टरांशी समन्वय साधून सेवा देण्याची विनंती केली. यावेळी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पोपट आदाते, डॉ. उमा त्रिभुवणे, आरोग्य सहायक विनायक सुर्वे, दत्तात्रय भस्मे, सर्व आरोग्य कर्मचारी, साखरपा परिसरातील सर्व खासगी डॉक्टर यावेळी उपस्थित होते.