ऑक्सिजन बेडसुद्धा होणार उपलब्ध
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय साखरपा याठिकाणी २५ बेडचे कोविड आयसोलेशन केंद्र शनिवारी सुरू करण्यात आले़ त्याचे लोकार्पण आमदार राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
मागील काही काळात साखरपा परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत होते. या रुग्णांना देवरूख किंवा रत्नागिरी या ठिकाणी न्यावे लागत होते. त्यामुळे रुग्णांची फरपट होत होती. ही गरज ओळखून पंचायत समिती सभापती जयसिंग माने यांनी साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे खासगी डॉक्टरांची बैठक घेत सर्वांना आवाहन केले हाेते. या बैठकीत खासगी डॉक्टरांनीही प्रतिसाद देत केंद्र सुरू व्हावे यासाठी सहकार्य करण्याचे ठरविले. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना जयसिंग माने यांनी परवानगीसाठी विनंती केली होती.
त्याप्रमाणे त्यांनी ग्रीन सिग्नल देताच पुढील बाबींची तरतूस करण्यात आली. जयसिंग माने यांनी परिसरातील दानशूर व्यक्तींना आवाहन केले. त्याला साथ देत उद्योजक व साखरपा-जाधववाडी येथील रहिवासी दिलीपकुमार केशव जाधव, शेखर कनावजे, साखरपा येथील खासगी डॉक्टर व सभापती जयसिंग माने यांनी स्वतः ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले. अशाच प्रकारे अनेक स्थानिकांनी यामध्ये हातभार लावला.
या केंद्राचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार राजन साळवी यांच्या समवेत सभापती जयसिंग माने, महिला व बालकल्याण माजी सभापती रजनी चिंगळे, पंचायत समिती सदस्य संजय कांबळे, काका कोलते, विनायक गोवरे, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, नायब तहसीलदार अनिल गोसावी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पी. बी. अदाते, ग्रामविकास अधिकारी दामले, स्थानिक डॉ. विद्याधर केतकर, मानसी देशपांडे, तलाठी पवार, ग्रामसेवक शिंदे उपस्थित होते.