फोटो ओळी- मंडणगड येथील बसस्थानकाच्या परिसरात गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : मंडणगड बसस्थानकाच्या परिसरात सुरू असलेले दुकान गाळ्यांचे बांधकाम तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. हे बांधकाम थांबवत नाही ताेपर्यंत तक्रारदार तहसील कार्यालयात ठाम मांडून हाेते. जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या पत्रानंतर नगरपंचायतीने सुरू असलेल्या बांधकामाचे पंचनामे करून काम थांबविण्याचे आदेश दिले. मात्र, लेखी आदेश दिल्याशिवाय बांधकाम थांबविणार नसल्याचे सांगताच हा वाद चिघळला. त्यानंतर पाेलिसांना बाेलावून हे काम थांबविण्यात आले.
मंडणगड बसस्थानकात सुरू असलेल्या गाळे बांधकामासंदर्भात एस. टी. महामंडळ अधिकारी, तक्रारदार व तहसीलदार यांच्यात शुक्रवारी तहसील कार्यालयात बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीला तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, विभाग वाहतूक नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहत्तर, विभागीय सहायक अधीक्षक वाणिज्य काव्या पेडणेकर, आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे, नगरपंचायत मुख्याधिकारी विनोद डौले, प्रशासकीय अधिकारी अभिजित राणे, तक्रारदार राकेश साळुंखे, वैभव कोकाटे, प्रवीण जाधव, खोकेधारक संघटनेचे अध्यक्ष दिनेश साखरे उपस्थित हाेते.
या सभेनंतर तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपंचायत व महामंडळ या दोन्ही खात्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेण्यात आली आहे. महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात महामंडळाच्या जागेत व्यावसायिक गाळे उभारले जातात. त्यावेळी स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घ्यावी लागत नाही. त्याप्रमाणे मंडणगडमध्येही प्रक्रिया राबवण्यात आली आहे. नगरपंचायत प्रशासनाने यासंदर्भात हरकत घेतली असल्याने याबाबत नगर रचनाकार कार्यालय व सर्व संबंधितांकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे, तसेच तोपर्यंत बसस्थानकाच्या आवारातील गाळ्याचे बांधकाम उभारणीचे काम बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात एस. टी. प्रशासन संबंधित आस्थापनाधारकांना तसा पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती मिळाली आहे.