चिपळूण : शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत शिरळ ग्रामस्थांनी आमदार सदानंद चव्हाण यांची भेट घेत याबाबत त्यांच्याकडे तक्रार केली. निकृष्ट दर्जाचा पोषण आहार विद्यार्थ्यांना देऊ नये अशा सूचना देतानाच हा प्रश्न विधीमंडळात उपस्थित करणार असल्याचे आमदार सदानंद चव्हाण यांनी सांगितले. चिपळुणातील अनेक शाळांमध्ये मूगडाळीची भरडा, न शिजणारे पांढरे वाटाणे वितरित करण्यात आले आहेत. याबाबत शिरळ ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद अध्यक्षांकडेही तक्रार केली आहे. याआधीही एक महिन्यापूर्वीच निकृष्ट धान्याबाबत तक्रार करुनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे जून, जुलैच्या पोषण आहारातील काही साहित्य हे निकृष्ट दर्जाचे पाठविण्यात आले. याबाबत शिरळचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी ग्रामस्थांसह आमदार चव्हाण यांची भेट घेऊन प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे साहित्याबाबतचा विषय आपण विधीमंडळात उपस्थित करणार असल्याचे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळावा यासाठी ही योजना सुरु केली असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी) उद्देशालाच हरताळ पोषण आहार ही योजना मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरु करण्यात आली आहे. निकृष्ट आहाराचा पुरवठा करुन या योजनेच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासण्यात येत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
पोषण आहाराचा मुद्दा विधीमंडळात
By admin | Published: August 01, 2016 12:24 AM