खेड : जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी कोकणात जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आलो आहे. कोकणी माणसाला भेटलो की, वेगळाच आनंद मिळतो, अशी भावना केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी खेड येथे बोलताना व्यक्त केली.
खेड भाजपतर्फे त्यांचे खेड भरणे नाका येथे सोमवारी रात्री सव्वादहा वाजता ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यास सर्व ते सहकार्य करेन, देशाची अर्थव्यवस्था समृद्ध व्हावी, उद्योजक तयार व्हावेत, असे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे आणि ते साकार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. खेड येथील दौऱ्यात राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांचे नाव न घेता खेडचे मित्र भेटायला आले नाहीत, अशी कोपरखळी मारली. यावेळी ते आले असते आणि मला मिठी मारून शुभेच्छा दिल्या असत्या, तर निश्चित आनंद झाला असता; पण ते आले नाहीत याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी खेड तालुका भाजप अध्यक्ष अनिल भोसले, शहराध्यक्ष अनिकेत कानडे, माजी अध्यक्ष संजय बुटाला, भूषण काणे, माजी नगराध्यक्ष आबा जोशी, ॲड. मिलिंद जाडकर, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
-----------------------
खेडचे मित्र आले नाहीत, पण सूर्यकांत दळवी आले
खेडचे मित्र जरी आले नाहीत, म्हणून काय झाले. दापोलीचे मित्र सूर्यकांत दळवी मला भेटायला आले. याचा मला आनंद आहे. ते माझ्यासोबत बराच वेळ आज दौऱ्यात होते. मात्र जाताना मला म्हणाले, मी आता जातो, तुम्हाला खेडचे मित्र भेटतील, पण खेडचे मित्र भेटले नाहीत, अशी भावनाही राणेंनी यावेळी व्यक्त केली.