रत्नागिरी : संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणे ही आमची जबाबदारीच आहे, ती आम्ही निभावतच असतो; परंतु निष्पाप लोकांचे संसार जेव्हा उघड्या डोळ्यासमोर वाहून जाताना दिसतात तेव्हा आमच्या वर्दीतला माणूसही हेलावूनच जातो, अशा शब्दात तब्बल ९ दिवस चिपळूणमध्ये मदतकार्यासाठी तळ ठोकून बसलेल्या रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी भावना व्यक्त केल्या. कुणाचेही संसार वाहून जाताना पाहून जे दु:ख हाेते ते शब्दात नाही सांगता येऊ शकत, असेही वाघमारे म्हणाले.
चिपळूणला आलेल्या महापुराने अनेकांवर आर्थिक, सामाजिक आणि भावनिक आघात केले. या महापुरात ज्यांचे सर्वस्व वाहून गेले त्यांना आधार देण्यासाठी हजारो हात उभे राहिले. यावेळी रत्नागिरी पोलिसांनी आपली जबाबदारी चोख बजावली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन काम केले. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्यावर डॉ. गर्ग यांनी विशेष जबाबदारी सोपविली होती. ती जबाबदारी निभावताना वाघमारे यांनी अनेकांचा उघड्यावर आलेला संसार पाहिला. ही सारी परिस्थिती पाहून त्यांनाही गहिवरून आले.
पुराबाबतच्या आठवणी सांगताना त्यांनी सांगितले की, महापुराची स्थिती जसजशी गंभीर होत होती तसे लोकांचे मदतीसाठी मोठ्या संख्यने सोशल मीडिया किंवा फोनद्वारे मेसेज होते. प्रत्येकाला मदत हवी होती. अशावेळी हे संदेश एकत्रित करून प्रत्येकापर्यंत किमान संपर्क साधण्याचा किंवा पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला. सुटका आणि मदतीसाठी जे-जे शक्य असेल ते-ते आम्ही त्यावेळी केले.
तर जसजसा पूर कमी होत होता तसतशा येणाऱ्या इतर समस्यांकडे आम्ही वळलो आणि त्यानुसार कामांचे नियोजन आखले. पूर कमी झाल्यानंतर चिपळूणमध्ये मदतीचे ओघ वाढले; मात्र त्यामुळे वाहतूक नियंत्रण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. पुरामुळे चिपळूणची दुरवस्था झाली होती. स्वच्छता हा मोठा विषय होता. जे स्वच्छता कर्मचारी कार्यरत होते त्यांच्या मदतीला आम्ही उभे राहिलो, त्यांना मदत केली, काम करताना अडचण आल्यास ती सोडवण्यास मदत केली. चिखल गाळ काढण्यासाठी पोलिसांनीही मदत सुरू केली. चिखल, गाळ काढण्यासाठी ३ जेसीबी आणि ६ डंपर उपलब्ध करण्यात आले हाेते, असे वाघमारे यांनी सांगितले.
पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींचे मोठ्या प्रमाणात दौरे सुरू झाले. त्या दौऱ्यांचे नियोजनही करण्याची जबाबदारी हाेतीच. त्यासाठी २० अधिकारी आणि १४० अंमलदार चिपळूण येथे कार्यरत होते, असे वाघमारे यांनी सांगितले. यापूर्वी २०१९ ला आलेल्या महापुरावेळी मी नाशिकला होतो. तेथेही पुरामुळे अनेक संसार उघड्यावर आलेले पाहिले आहेत. चिपळूणची आपत्ती ही नाशिकपेक्षा मोठी होती; पण कुणाचेही संसार वाहून जाताना पाहणे हे खरंच मोठे दुःख असते. ते दुःख दोन्ही ठिकाणी मी अनुभवलेत; परंतु त्याचवेळी अशा संकटाच्या काळात माणूस जात, धर्म विसरून माणसाच्या पाठीशी मदतीच्या रूपाने कसा उभा राहतो, हेही चिपळूण आपत्तीच्या निमित्ताने दिसल्याचे वाघमारे यांनी सांगितले.