रत्नागिरी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत २९ आमदार ‘नाॅट रिचेबल’ असल्याने राज्यातील राजकारणात वादळ उठले आहे. शिवसेनेच्या आमदारांबाबत उलटसुलट चर्चा सुरु असतानाच रत्नागिरीतील शिवसेनेचे चारही आमदार मात्र ‘रिचेबल’ आहेत. या चारही आमदारांनी आपण शिवसेनेसाेबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटल्यानंतर नाराजीचे राजकारण सुरु झाले आहे. त्यानंतर साेमवारी सायंकाळपासून शिवसेनेचे ठाण्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यांच्यासोबत जवळपास २९ शिवसेना आमदार ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना आमदार संपर्काच्या बाहेर गेल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे चारही आमदार सध्या कोठे आहेत, याची चर्चा रंगू लागली आहे.जिल्ह्यातील चारही आमदारांचे फाेन ‘संपर्क क्षेत्रात’ असल्याने साऱ्यांनाच हायसे वाटले आहे. प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता सर्वांनी पक्षासाेबतच असल्याचे सांगितले. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरीत मंगळवारी नियोजित दौरा होता. परंतु, सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर ते मुंबईतच तळ ठोकून आहेत.खेडचे आमदार योगेश कदम यांनी आपण शिवसेनेसोबत असून, आपल्या रक्तात शिवसेना आहे. त्यामुळे शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार असल्याचे सांगितले आहे.गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही आपण चिपळुणात असून, शिवसेनेच्या पदाधिकार्यांची बैठक घेत असल्याचे सांगितले. आपला वरिष्ठांशी संपर्क झाला असून, वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणेच जी जबाबदारी खांद्यावर देतील ती पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले.राजापूरचे आमदार राजन साळवी हे रत्नागिरीत येण्यासाठी निघाले होते. मात्र, सोमवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर ने पुन्हा मुंबईला रवाना झाले. आमदार साळवी यांच्या संपर्क साधला असता, आपण स्व. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. माझी निष्ठा ही बाळासाहेबांच्या पायाशी आहे. त्यामुळे शिवसेनेशिवाय आपण कधी विचारही करणार नाही. आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर काही आमदारांसोबत जात असल्याचे सांगितले.
रत्नागिरीतील शिवसेनेचे चारही आमदार ‘रिचेबल’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 1:49 PM