चिपळूण : तापमान वाढीवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनाची लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे. यासाठी वृक्ष लागवडीची स्पर्धा घेतलेल्या खेड तालुक्यातील घाणेखुंट ग्रामपंचायतीने नव्या घराचे बांधकाम करताना झाडं लावलीच पाहिजेत, अशी नियमाने अट घातली आहे. झाड न लावल्यास घरपट्टीची आकारणीच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय शोषखड्डे बांधणेही केले बंधनकारक केले आहे.घाणेखुंटचे सरपंच राजू ठसाळे यांनी लोक हिताचे विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. विकास कामांसाठी शासकीय निधी सोबतच त्याला लोकसहभागाची जोड दिली आहे. घाणेखंट गाव एमआयडीसीच्या बाजूलाच असल्याने येथे प्रदूषण होतेच. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीवर त्यांनी भर दिला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात त्यांनी ग्रामस्थांसाठी वृक्ष लागवडीची स्पर्धा सुरू केली. याहीपुढे जाऊन प्रदूषणमुक्त गाव, ऑक्सिजन युक्त गाव व पर्यावरण पूरक गाव होण्यासाठी आणखी एक अनोखा निर्णय घेतला. नवीन घर बांधतेवेळी झाडे लावून ती जगविणे बंधनकारक केले आहे.ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील केला आहे. त्यामुळे नवीन घराचे बांधकाम करताना देशी झाडे लावून ती जगवणे बंधनकारक राहणार आहे. एखाद्याने झाडे न लावल्यास त्यांच्या घराची घरपट्टी आकारणी केली जाणार नाही. यातून गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होऊन गावाचे निसर्ग सौदर्य वाढवण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. शोषखड्डे नाहीत तर घरपट्टी आकारणी नाहीनवीन घर बांधताना झाडाबरोबरच ओला आणि सुक्या कचऱ्याचे विघटन होण्यासाठी शोषखड्डे उभारणे बंधनकारक केले आहे. हे शोषखड्डे न केल्यास घरपट्टीची आकारणी केली जाणार नाही. ज्यांनी शोषखड्डे बांधले नाहीत. त्यांची अद्याप आकारणी झालेली नाही. मात्र आता ग्रामस्थांमध्येही याविषयीची जागरूकता वाढत आहे.
घाणेखुंट गाव प्रदूषणकारी औद्योगिक कारखान्यांच्या शेजारी असून त्याचे दूरगामी परिणाम यापूर्वी आम्ही भोगले आणि भविष्यातही भोगू. याचाच विचार करून आपल्या येणाऱ्या पिढीला किमान आपले जीवन सुस्थितीत जावे, यासाठी हा सगळा खटाटोप करीत आहे. बाकी सर्व दिनक्रम, जीवनक्रम चालू राहील, चढ उतार येत राहतील, पण सुजाण नागरिक म्हणून काही समाजाप्रती, निसर्गाप्रती, कुटुंबाप्रती जबाबदारी आपली पण आहे. - राजू उर्फ संतोष ठसाळे, सरपंच घाणेखुंट