रत्नागिरी : शिवसेना भवनात ज्या आसनावर बसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या तळागाळात शिवसेना रुजवली, ते आसन मी माझ्य घरी आणले आहे. मी त्याची नित्यनेमाने पूजा करतो. मात्र माझ्या संपत्तीची मोजदाद करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या अनमोल आसनाचीही किंमत केली, हे दुर्दैव आहे, अशी खंत राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केली. माझ्या निष्ठेचे मोल लावले गेले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरुन आमदार राजन साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जवळपास सव्वा-दीड वर्ष चौकशी करण्यात आली. त्यांची सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आली. त्यानंतर आमदार साळवी, त्यांची पत्नी आणि मुलगा अशा तिघांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला.या चौकशीदरम्यान आमदार साळवी यांच्या मालमत्तेचे मूल्यांकन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले. घरातील इतर साहित्याची किंमत करतानाच आमदार साळवी यांच्या घरात असलेले बाळासाहेबांचे आसन आणि त्यावरील बाळासाहेबांची फोटो फ्रेम याचेही मूल्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठरवले आहे. बाळासाहेबांच्या आसनाची किंमत १० हजार रुपये तर फोटो फ्रेमची किंमत पाच हजार रुपये असे यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.या प्रकाराबाबत आमदार साळवी यांनी खंत व्यक्त केली आहे. शिवसेना भवन, दादर येथे ज्या आसनावर बसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बसून शिवसेना चालवली, वाढवली आणि ज्यामुळे आज जे राज्यकर्ते झालेत त्यांना नावारूपाला आणले, त्यांच्या आदेशाने या आसनांची किंमत ठरवली जावी, हे दुर्दैव आहे.
बाळासाहेबांची आठवण म्हणून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने मी हे आसन माझा निवासस्थानी आणले. माझा चिरंजीव अथर्व याने रेखाटलेले बाळासाहेबांचे सुंदर चित्र त्यावर ठेवले आहे. माझी पत्नी अनुजा व मी त्या आसनाची नित्यनियमाने पूजा करतो. माझ्यासाठी ते अनमोल आहे. मात्र त्याची किंमत केली गेली, हे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले.