रत्नागिरी : सामान्य नागरिकांची रुग्णवाहिका चालकांकडून लूट होऊ नये यासाठी पोलीस विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे़ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी रुग्णवाहिकांसाठी दरही निश्चित केला असून, हे दरपत्रक रुग्णवाहिकेत लावणे बंधनकारक केले आहे़ गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांच्या उपस्थितीत दरपत्रक लावण्यात आले़
कोरोनाच्या काळात जनता हैराण झालेली असताना त्यांच्या या असाहाय्यतेचा गैरफायदा उठवत कोविड रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकांकडून भरमसाट भाडे आकारले जात असल्याचा आराेप करण्यात येत आहे़ रत्नागिरीत जाण्यासाठी ३ ते ४ हजार रुपये, कोल्हापूर येथे जाण्यासाठी ८ ते १० हजार रुपये, तर मुंबईला जाण्यासाठी २५ ते ३० हजार रुपये इतके भाडे आकारण्यात येत होते. त्यामुळे रुग्णवाहिकांचे दर निश्चित करण्याची मागणी करण्यात येत हाेती़
त्यानंतर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांनी पुढाकार घेऊन रुग्णवाहिकेचे दर निश्चित केले आहेत. हे सर्व दरपत्रक जिल्ह्यातील १६७ रुग्णवाहिकांवर व जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, प्राथमिक केंद्रांवरही बसविण्यात येणार आहे. या दरपत्रकानुसार जर कोणत्याही रुग्णवाहिकेने दर घेतले नाहीत किंवा जादा दर घेतले तर त्यांची तक्रार करण्याचे आवाहनही केले आहे. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश मोराडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक सत्यवंत पाटील उपस्थित होते.
-------------------------------------
रुग्णवाहिकांसाठी दर निश्चित करण्यात आले असून, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी हे दरपत्रक रुग्णवाहिकेत लावले़ यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर उपस्थित हाेते़ (छाया : तन्मय दाते)