रत्नागिरी : रत्नागिरीतच राहून परदेशात अकाऊंटिंगच्या सेवा देणे शक्य आहे. पुण्यामुंबईच्या सीएंनाच नव्हे तर रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागातील सीएसुद्धा या सेवा देऊ शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सीए व सीएसंदर्भातील अभ्यासक्रमांकडे वळणे आवश्यक आहे. सीए हा देशाचा महत्त्वाचा घटक असून देश विकासात सीएचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी केले.
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेला भेट दिल्यानंतर चितळे यांनी मार्गदर्शन केले. वेस्टर्न बॉडीचे अध्यक्ष मनीष गाडिया, उपाध्यक्ष दृष्टी देसाई, सेक्रेटरी अर्पित काब्रा, यशवंत कासार उपस्थित होते. प्रारंभी रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आनंद पंडित यांनी स्वागत केले.
चंद्रशेखर चितळे यांनी मार्गदर्शन करताना, भारतासारख्या विशाल देशात जीएसटीची क्रांती यशस्वी होत आहे. जीएसटी लागू करण्यापूर्वी सीए इन्स्टिट्यूट त्यावर संशोधन करत होती. जीएसटीसाठी व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांना प्रशिक्षण देण्याचे कामही इन्स्टिट्यूटने केले आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर या क्षेत्रात काम करण्यासाठी कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ कमी पडत आहे. ते प्रशिक्षित मनुष्यबळ मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
सी. ए. इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेला वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल बॉडीच्या अध्यक्षांसह समितीने रत्नागिरीला भेट दिली. या वेळी चंद्रशेखर चितळे यांच्यासह शाखेचे उपाध्यक्ष प्रसाद आचरेकर, कमिटी मेंबर बिपीन शाह, अँथनी राजशेखर उपस्थित होते.
संस्थेच्या उपाध्यक्ष दृष्टी देसाई यांनी मार्गदर्शन करताना, महिलांना विवाह, सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे कामात खंड पडतो, त्यांच्यासाठी वेबपोर्टल बनवले आहे. त्यात आतापर्यंत ८०० हून अधिक महिलांनी नोंदणी केली व समस्या मांडली, त्यांना मदत केल्यामुळे अनेक महिला सीएंनी कामाला सुरुवातही केली असल्याचे सांगितले.