चिपळूण : पुणे येथील मे. माॅडर्न सर्व्हे कन्सलटंसी या कंपनीने सर्व्हेक्षण पूर्ण केले असून, चिपळूण व खेड तालुक्यातील २७ गावांना धरणाच्या आऊटलेटमधून ग्रॅव्हीटीने पाणी देणे शक्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे, असे लेखी उत्तर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे.
काेळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीत साेडण्यात येणाऱ्या आणि वाहून जाऊन समुद्राला मिळणारे पाणी वळविण्याबाबत आमदार भास्कर जाधव यांनी तारांकित प्रश्न मांडला. त्याला उत्तर देताना ही माहिती देण्यात आली.
कोयना धरणातील पाणी वीजनिर्मितीकरता वापरल्यानंतर कोळकेवाडी धरणामध्ये सोडण्यात येते. या पाण्याचा वापर पुन्हा वीजनिर्मितीकरिता करण्यात येतो आणि जवळपास ६७.५० अब्ज घनफुट इतके पाणी कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीमध्ये सोडण्यात येते. यातील बहुतांश पाणी हे वाहून जाऊन समुद्राला मिळते. वाहून जाणारे हे पाणी परिसरातील कित्येक गावांची तहान भागवू शकते व ही गावे कायमस्वरूपी टंचाईमुक्त होऊ शकता, या दृष्टीकोनातून आमदार भास्कर जाधव हे गेल्या काही वर्षापासून सतत संघर्ष आणि पाठपुरावा करीत आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या विषयाला चालना मिळाली. गेल्यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर २८ फेब्रुवारी २०२० रोजी जलसंपदा मंत्री पाटील यांनी विविध विभागातर्फे अभ्यास समिती नेमून त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर दिले होते. त्यानुसार पुणे येथील मे. माॅडर्न सर्व्हे कन्सलटंसी या कंपनीची नेमणूक करण्यात आली.
आमदार जाधव यांनी हिवाळी अधिवेशनातही तारांकित प्रश्नाद्वारे या विषयाचा पुन्हा पाठपुरावा केला. त्यावरील लेखी उत्तरात जलसंपदा मंत्री पाटील यांनी मे. माॅडर्न सर्व्हे कन्सलटंसी या कंपनीने सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. त्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणानुसार २४ ग्रामपंचायतीमधील २७ गावांना ग्रॅव्हीटीने धरणाच्या आऊटलेटमधून पाणी देणे शक्य आहे. या २७ पैकी १५ गावांतील सर्व वाड्यांना तर १२ गावांतील काही वाड्यांना पाणी देता येऊ शकेल, असे स्पष्ट केले आहे.
ही आहेत ती २७ गावे
चिपळूण तालुक्यातील कान्हे, पिंपळी खुर्द, चिंचघरी सती, खेर्डी, कापसाळ, कामथे बु., मिरजोळी, कोंढे, शिरळ, पेढे, वालोपे, कळंबस्ते, खांदाटपाली, पाली, दळवटणे, वालोटी, खडपोली, कालुस्ते, करंजीकर मोहल्ला. खेड तालुक्यातील काडवली, काजवेवाडी, नवीन कोळकेवाडी, आंबडस, चिरणी, लोटे, धामणदेवी, भेलसई.