शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

नेमेचि येतो पावसाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:21 AM

आमच्या घरासमोर एक चिंचेचे भले मोठे जुनाट झाड आहे. गेली अनेक वर्षे ते तसेच आहे. बाहेर पडणारा पाऊस कमी ...

आमच्या घरासमोर एक चिंचेचे भले मोठे जुनाट झाड आहे. गेली अनेक वर्षे ते तसेच आहे. बाहेर पडणारा पाऊस कमी झालाय की वाढलाय ते आम्ही चिंचेच्या बुंध्याकडे बघून ठरवायचो. चिंचेच्या काळ्या बुंध्याकडे पाहिले की, पावसाच्या धारा अगदी स्पष्ट दिसायच्या, अजूनही दिसतात. दरवर्षी भातलावणीच्या सुमारास ही चिंच बहरून फुलते. चिंचेच्या फुलांच्या सड्याने चिंचेखालची पायवाट भरून जाते. चिंचेची फुले इवलीशी असली तरी छान नक्षीदार व सुंदर रंगीत दिसतात. चिंचेचे एक फूल हातात घेऊन बारकाईने पाहिले तर निसर्ग एक अभिजात कलावंत आहे, याची खात्री पटते. चिंचेखालच्या कोपऱ्यात भातलावणीसाठी चिखल करताना ही चिंच आजही एखाद्या नवरीसारखी फुलून सजली आहे, असे वाटते. अनेकदा याच चिंचेवर बसून दोन-चार धनेश पक्षी पावसाची चाहुलही देतात. याच चिंचेच्या उंच बुंध्यातल्या एका ढोलीत डोक्यावर तुरा असलेला एक सापसदृश्य प्राणी राहतो, असे बाबा सांगतो. तो अधूनमधून टर्रटर्र असा फटफटीसारखा आवाज काढत असतो. असा आवाज मी अनेकवेळेस ऐकला आहे. परंतु, हा विचित्र प्राणी अजून मला दिसला नाही.

पावसाळ्यात महापुरुषाजवळच्या कुरणावर छान गवत रूजते. श्रावणापर्यंत या माळावर गवताची मऊ, हिरवी गादीच तयार होते. या गवतात दररोज संध्याकाळी रातचांदणीची पांढरीशुभ्र फुले फुलतात. कोणी या फुलांना चटकचांदण्या म्हणतात. मुलायम व कोमल पांढरी फुले खूप छान दिसतात. ही फुले चांदणीसारखीच दिसतात. अशा पांढऱ्या फुलांमध्येच पिवळी हरणे (सोनकमळे) फुलल्याने हे महापुरुषाचे कुरण खूप सुंदर दिसते. पण याच गवतात, छोट्या खडकांच्या कपारीत ‘कोचा’ नावाची छोटी व जमिनीलगत पसरणारी वनस्पतीही असते. या कोचांना अतिशय टोकदार तीक्ष्ण काटेरी सुळे असतात. जनावरांच्या मागून अनवाणी धावताना पूर्वी हे काटे पायांत घुसायचे. आजही या माळावर ही कोचे उगवतात, वाढतात. पण त्यावरुन बिनधास्त चालणारी अनवाणी पावले आता इतिहासजमा झाली आहेत.

पावसाळ्यात आमची सर्वांचीच जनावरे दिवसभर याच महापुरुषाच्या कुरणावर चरायची. बालपणी या माळावर जनावरे राखणे हेच आम्हा मुलांचे मोठे काम असायचे. जनावरे हिरवे गवत खाण्यात रमून गेली की, महापुरुषाच्या विशाल पिंपळाखाली आमचा कबड्डीचा व गोट्यांचा डाव रंगायचा. जमिनीवर मातीत एक ‘गल’ करून आम्ही भिडू ठरवून गोट्यांचे डाव खेळायचो. सिमेंटच्या गोट्यांना आम्ही गजरे म्हणायचो. असे गजरे गावातल्या दुकानांमध्ये तेव्हा विकतही मिळत. आमच्या शेजारचा बुटुकला संत्या अशा गजऱ्यांच्या खेळात तरबेज होता. कितीही लांबची गोटी तो अचूक उडवायचा. संत्याच्या संघात सामील होण्यासाठी आमची नेहमी धडपड असे. तिथेच आम्ही कुदळीने रेषा खणून दरवर्षी कबड्डीचे मैदान आखायचो. गवत व मऊ जमीन असल्याने कबड्डी खेळताना बहुधा मार लागायचा नाही. ‘रेडर’च्या तंगडीत घुसून ‘टॅकल’ करण्यात मी तेव्हा तरबेज होतो. त्या काळात महापुरुषाकडे खेळलेले काही डाव आजही स्मरणात आहेत. आमचे डाव रंगात आले असतानाच आश्लेषा नक्षत्राचा पाऊस अचानक सळसळत आम्हाला भिजवून टाकायचा. असा सळसळ आवाज करत डोंगरातून सरकत चाललेला पांढरट पाऊस खूप छान दिसायचा. सळसळत्या पावसाच्या आवाजाने जनावरे अचानक गोंधळून माळभर धावत सुटायची. अशा सुसाटलेल्या जनावरांना आवरताना आम्हा मुलांच्या नाकीनऊ यायचे. अशावेळेस आम्ही घरी पोहोचण्याआधी जनावरे घरी गोठ्यात पोहोचली तर मात्र बाबा खूप ओरडायचा. बालपणात अनुभवलेले असे काही पावसाळे अजूनही काल परवा आल्यासारखे डोळ्यांसमोर दिसतात. पावसाळा ‘नेमेचि’ येत असला तरी आठवणीतला पाऊस मात्र दीर्घकाळपर्यंत आपल्या मनात रुंजी घालत राहतो. बालपणी अनुभवलेले असेच काही पावसाळे अजूनही मनात रुंजी घालतात.

- बाबू घाडीगावकर, जालगाव, दापोली.