रत्नागिरी : ‘ताऊते’ चक्रीवादळाचा इशारा दिला असतानाच रत्नागिरी शहर परिसरात शनिवारी सायंकाळी मोठ्या सरींसह पावसाला सुरूवात झाली. तसेच गडगडाटासह पाऊस पडत आहे. काही भागात वीजप्रवाह खंडित झाला होता. मात्र, वाऱ्याचा वेग मात्र कमी आहे. हे वादळ उद्या (१६ मे) पहाटे रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
रत्नागिरी, चिपळुण शहर परिसरात तसेच गुहागरात शनिवारी सायंकाळी मोठ्या सरींसह पावसाला सुरूवात झाली. तसेच वीजेच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. काही भागात वीजप्रवाह गायब झाला होता.
अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ शुक्रवारी तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्याची तीव्रता आणखी वाढून केरळ किनारपट्टीलगतच्या समुद्रात ‘ताऊते’चक्रीवादळ घोंगावू लागले आहे. पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली असून, ही वादळी प्रणाली उद्यापर्यंत (ता.१६) महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीकडे येण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.