लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रोहिदास व रविदास समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेला आहे. काही विकासात्मक गोष्टींपासून हा समाज वंचित राहिला आहे. काही ठिकाणी समाजातील भगिनींना विकृतांच्या अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी कायम कटिबद्ध असल्याचे भारतीय चर्मकार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांनी सांगितले.
प्रसार माध्यमांशी बाेलताना त्यांनी सांगितले की, आपल्या समाजातील विविध व्यक्ती समाजपयोगी कार्य करून नावारूपाला आलेल्या आहेत; परंतु आताच्या परिस्थितीत समाजाचा विकास होताना दिसत नाही. सरकारच्या योजना असोत किंवा इतर काही गोष्टींची माहिती समाजापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील गरीब कुटुंब, तसेच होतकरू विद्यार्थ्यांना मिळत नाही. आपल्या समाजातील खूप लोक मोठमोठ्या शासकीय अधिकारी तसेच राजकीय पदावर विराजमान आहेत; पण समाजाच्या कल्याणासाठी पुढाकार घेण्याची त्यांची मानसिकता होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही मानसिकता बदलून समाजाच्या भल्यासाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे निवळकर म्हणाले.
काही लोक रोहिदास आणि रविदास असा भेदभाव करून समाजामध्ये भांडण लावून दुफळी निर्माण करत आहेत. हा वाद मिटवून सर्वांनी एकजुटीने समाजाच्या न्यायहक्कांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. हे एकत्रीकरण घडवण्यासाठी व चर्चेकरिता भारतीय चर्मकार समाज संघटनेचे राज्याध्यक्ष पंढरीनाथ चव्हाण यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संजय निवळकर यांनी दिली.