रत्नागिरी : काेराेनाच्या काळात मानसिक आरोग्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान असणे काळाची गरज असल्याचे मत पुणे येथील मानसाेपचार तज्ज्ञ डॉ. संदीप महामुनी यांनी व्यक्त केले़ रत्नागिरी क्लब आणि परिचारिका वेल्फेअर मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘कोरोना काळातील मानसिक आरोग्य’ या विषयावर प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप महामुनी यांनी ऑनलाइन मत मांडले आहे.
परिचारिका वेल्फेअर मंच यांच्यातर्फे दर महिन्याला परिचारिका आणि सर्वसामान्य जनतेला उपयोगी असे कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे. मे महिन्यातील कार्यक्रम परिचारिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी संदीप लोखंडे या मल्टी टॅलेंटेड कलाकाराने मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला. डॉ.संदीप महामुनी यांनी आपल्या व्याख्यानामध्ये मानसिक आरोग्याचे प्रकार अतिशय सोप्या आणि सर्वसामान्य लोकांना समजतील असे समजून सांगितले. सर्वसाधारण निरीक्षणांमधून आपणसुद्धा आपल्या घरातील आणि मित्रमंडळींना मानसिक आजाराचा अंदाज येऊ शकतो, असे सांगितले.
नुकत्याच वयात येणाऱ्या; परंतु दहावी आणि बारावी सारख्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या वर्षांमध्ये कोणते मानसिक बदल होतात, तसेच कोरोनाकाळामध्ये ऑनलाइनची जोड असल्याने किशोरवयातील आणि तरुण वयातील मुलं भरकटणार नाहीत ना ? यासाठी पालकांनी डॉक्टरांना प्रश्न विचारले़ या प्रश्नाच्या उत्तरामध्ये डॉ. महामुनी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांशी सतत संवाद ठेवून लैंगिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये योग्य आणि शास्त्रशुद्ध माहिती देणे ही पालकांचीसुद्धा जबाबदारी आहे.
कोरोनाकाळामध्ये परिचारिका वर्गाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांच्या तणावाचे मूळ कारण सांगून समाज आणि परिचारिकांच्या घरातील व्यक्तीने कशा प्रकारे सहकार्य केले पाहिजे याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये परिचारिका वेल्फेअर मंचतर्फे पूर्वा महेश आंबेकर, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलच्या परिसेविका यांनी डॉ. संदीप महामुनी यांची ओळख सांगितली. रत्नागिरी क्लबतर्फे प्राध्यापक उदय बामणे ॲड. योगिता पावसकर- फणसेकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्नेहा बने,परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष तसेच घाडी काॅलेजचे माजी प्राचार्य डॉ. प्रभाकर द्राक्षे, उपस्थित होते़ सदर कार्यक्रमाची प्रस्तावना करताना डॉ. आनंद आंबेकर यांनी केली़ जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रभाकर मुळेकर यांनी आभार मानले.