लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : ठेकेदारांची वाढीव बिले काढावी, असा कोणताही ठराव झाला नव्हता. तरीही खोटा ठराव करून त्याला सूचक म्हणून माझे नाव टाकले. माझे नाव टाकायचे नाही, असे पत्र दिले म्हणून गटनेते उमेश सकपाळ आपले नाव टाकण्यासाठी कोणत्या अधिकारात पत्र देतात. मुळात अंतिम मंजुरीला ठराव येण्यापूर्वी सकपाळ यांनी पत्र दिलेच का, असा प्रश्न महाविकास आघाडीचे नगरसेवक अविनाश केळस्कर यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून येथील महाविकास आघाडीत वाढीव बिलांवरून खदखद सुरु आहे. याविषयी खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीत ठेकेदारांची वाढीव बिले काढावीत, यासाठी पत्र दिल्याने गटनेते सकपाळ यांना झापले, अशी चर्चा होती. परंतु, असा कसलाही प्रकार घडलेला नाही, असा खुलासा सकपाळ यांनी केला आहे. यासाठी मी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार पालिकेशी केलेला नाही. हे केवळ मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, मी केवळ मागील सभेत झालेल्या ठरावाला अविनाश केळस्कर सूचक होते. त्यांनी आपण या ठरावाचे सूचक राहणार नाही, असे कळल्यामुळे माझे नाव सूचक म्हणून घ्यावे एवढेच पत्र दिल्याचा स्पष्ट खुलासा शिवसेनेचे गटनेते व शहरप्रमुख सकपाळ यांनी यांनी केला आहे.
याविषयी केळस्कर यांनी माहिती देताना सांगितले की, वाढीव बिलं द्यायची नाही, अशी भूमिका महाविकास आघाडीने सुरुवातीपासून ठेवली आहे. त्यामुळे वाढीव बिलं देण्यासाठी ठराव मांडण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही खोटा ठराव करून त्याला सूचक म्हणून माझे नाव टाकले हे कदापि मी सहन करू शकत नाही. त्यामुळेच आपले नाव सूचक म्हणून ठरावाला घेऊ नये, असे कळवले. मुळात १२ एप्रिलच्या सभेत हा विषय झाला, पण असा ठराव मी मांडला नाही. त्याशिवाय पुढील सभेत इतिवृत्त मंजुरीसाठी ठेवायला हवा होता. मात्र, त्याआधीच गटनेते सकपाळ यांनी माझ्या नावाऐवजी त्यांचे सूचक म्हणून नाव देण्यासाठी पत्र दिले. त्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न केळस्कर यांनी केला आहे.