खाडीपट्टा : खाडीपट्टासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता बुद्धी आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर पारंपरिक शिक्षणाला फाटा देत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले नशीब आजमावत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरातील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित असणाऱ्या आयटी क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक, डीएड, कला शाखेची पदवी, बीएड, सैन्यदल, कृषी डिप्लोमा ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पारंपरिक क्षेत्र होती. आता या क्षेत्रातही जीवघेणी स्पर्धा असून, नोकरीसाठी वणवण करावी लागले. त्यासाठी पैसा आणि वशिल्याची गरज असल्याच्या बाबी उघडपणे बोलल्या जात आहेत. शिवाय अलिकडच्या काळात या क्षेत्रातील कॉलेजची संख्या आणि विद्यार्थी संख्याही वाढल्याने नोकरीची शाश्वती नसल्याने विद्यार्थ्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या दहा-बारा वर्षात देश-विदेशातील इन्फोसिस, आयजीएम, इन्फोटेक, कोहिनूर, टीसीएस, विप्रो, सत्यम, आयप्लेक्स यांसारख्या अनेक नामांकित आयटी कंपन्या आपल्या देशात छोट्या-मोठ्या शहरातून आपला विस्तार झपाट्याने करत आहेत. याबाबतीत कोकण दुर्लक्षित असले तरी आता चिपळूण, दापोलीसह पुणे, ठाणे, मुंबईसारख्या शहरात या कंपन्यांनी जाळे विणल्याचे दिसून येत आहे. २० हजारांपासून लाखो रुपये पगार मिळवण्याची संधी या क्षेत्रात तरुणांना मिळत आहे. या क्षेत्रात गुणवत्तेवर निवड होत असल्याने खाडीपट्टासारख्या ग्रामीण तरुणाईलाही हे क्षेत्र साद घालताना दिसत आहे. कॉम्प्युटर डिप्लोमा, बीई, बी. टेक, एमटेक, आयटी अशा शिक्षणासाठी ग्रामीण भागातील अनेक तरुण शहराकडे वळत आहेत. (वार्ताहर)
तरुणाईला आयटीची साद...
By admin | Published: August 26, 2014 9:15 PM