शोभना कांबळे ल्ल रत्नागिरी अपघाती मृत्यू झालेल्या पतीच्या निधनाचा आघात खंबीरपणे पेलवून शाळा हेच सर्वस्व मानणाऱ्या करबुडे - कुंभारवाडी शाळेच्या शिक्षिका रचना रवींद्र सावंत यांनी गेली २८ वर्षे संकटांचे अनेक अडथळे पार करीत सेवाभावी वृत्तीने ज्ञानदान करत आहेत. चांगले विद्यार्थी घडताहेत, हेच माझे पुरस्कार, या भावनेतून त्या आपले कार्य अहर्निश करीत आहेत. शौर्य, धाडस याचे अप्रूप असलेल्या रचना सावंत यांना खरंतर पोलीस व्हायच होतं. पण, परिस्थितीमुळे त्या शिक्षकी पेशात आल्या. नोकरीच्या सुरूवातीला रचना सावंत यांना संगमेश्वर, चिपळूण येथील ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत त्यांना एका हायस्कूलमध्ये आणि पाच जिल्हा परिषद शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ग्रामीण भाग असूनही ही मुले अतिशय हुशार आणि कष्टाळू आहेत, खेळातही ती खूपच तरबेज असल्याचे या काळात त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी या मुलांना घडवण्यासाठी कष्ट घेण्याचा निर्णय घेतला, तो अमलातही आणला. पण, या मुलांची गैरहजेरी त्रासदायक होत होती. अशावेळी साथ मिळाली ती पोलीस असलेल्या पतीची - रवींद्र सावंत यांची! शाळेतील मुलांशी त्यांचं विशेष सख्य असल्याने गैरहजेरीचे रूपांतर पूर्ण हजेरीत झाले, पालकांचेही सहकार्य महत्त्वाचे ठरले. सन १९९४मध्ये रत्नागिरी तालुक्यातील पानवल - घवाळीवाडी प्राथमिक शाळेत रचना सावंत यांना काम करण्याची संधी मिळाली. ही शाळा सुरूवातीला पाचवीपर्यंत होती. पुढे पालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने पुढे सातवीपर्यंत झाली. मुले हुशार आणि जिज्ञासू होती. शाळेला मोठे पटांगणही होते. यावर रचना सावंत यांनी ढोलाच्या तालावर पंचरंगी कवायतीला प्रारंभ केला. हुरूपाने कार्य करत असतानाच शिक्षणकार्यात त्यांना बहुमोल साथ देणाऱ्या पतीचे २००८ साली अपघाती निधन झाले आणि त्यांची साथ सुटली. त्यातच करबुडे - कुंभारवाडी शाळेत त्यांची बदली झाली. मुलगा आजीकडे म्हणजे त्यांच्या आईकडे राहायचा. एकाकी आयुष्य वैराण वाटू लागले. पण, यातूनही त्यांनी स्वत:ला सावरले आणि शाळेतील निरागस मुले हेच आपले विश्व, असे समजून त्यांनी ‘फिनिक्स’ पक्ष्याप्रमाणे जीवनात उभारी घेतली. गेल्या आठ वर्षांत तर त्यांनी पालक, सहकारी शिक्षक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने विविध आगळेवेगळे उपक्रम राबवले आहेत. जिल्हा ते राज्यस्तरापर्यंत त्यांनी विज्ञानप्रदर्शनात सहभाग घेतला. त्यांच्या सामुदायिक शेततळे या प्रतिकृतीतून, सांडपाण्याचा पुनर्वापर यातून अगदी राज्यस्तरापर्यंत पाण्याचे महत्व हा संदेश देता आला. उपक्रमशील शाळा म्हणून त्यांनी त्यांच्या शाळेची ओळख निर्माण केली. बालवयात मुलांना बचतीची सवय लागावी, यासाठी त्यांनी ‘विद्यार्थी कल्याण बचत बँक’ हा उपक्रम शाळेत राबवला. इंग्रजी भाषेची गोडी लागावी, या हेतूने इंग्रजी बँक निर्माण केली. कार्यानुभव हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय! त्याच्या माध्यमातून टाकाऊपासून सौंदर्याकृती निर्माण करून त्यातून रोजगारसंधीही उपलब्ध होऊ शकते, ही दिशा त्यांनी मुलांना मिळवून दिली. डॉ. स्वप्नील तांबे, हातखंबाच्या सरपंच विद्या बोंबले हे त्यांचे यशस्वी विद्यार्थी. तसेच इतरही विद्यार्थी चांगल्या हुद्द्यांवर काम करीत आहेत. रचना सावंत यांच्यासाठी हेच पुरस्कार मोठे मानतात. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांसाठी जिल्हा परिषदेकडून आदर्श पुरस्कार दिले जातात. पण, काही वेळा असे विविध उपक्रम राबवणारे शिक्षक उपेक्षित राहतात. यासाठी निवड समिती स्थापन करून अशा शिक्षकांचा शोध घेतला, तर ग्रामीण भागात तळमळीने कार्य करणाऱ्या रचना सावंत यांच्यासारख्या शिक्षकांचे कार्य समाजासमोर येईल, अन्यथा या शिक्षकांचे काम कधीच समोर येणार नाही. व्हायचे होते पोलीस... खरंतर पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असताना केवळ परिस्थितीमुळे शिक्षकी पेशा स्वीकारण्याची वेळ रचना सावंत यांच्यावर आली. पतीच्या खंबीर साथीने त्यांनी शिक्षकी पेशात आपला ठसा उमटविला आहे.
चांगले विद्यार्थी घडणे हाच माझ्यासाठी पुरस्कार
By admin | Published: September 04, 2016 10:52 PM