रत्नागिरी : शहरातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असलेल्या जे. के. फाईल्स इंजिनिअरींग कंपनी बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कंपनीने रत्नागिरीतील तीन डिपार्टमेंट बंद करुन तेथील कामगारांना उर्वरीत चार डिपार्टमेंटमध्ये हलवले आहे. संचालक मंडळाने शुक्रवारी (१६ जून) रत्नागिरीत येऊन कामगारांना सात लाख रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, कंपनी बंद झाल्यास कायमस्वरुपी असलेल्या सुमारे तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे.रत्नागिरी येथील मिरजोळे एमआयडीसीमध्ये सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी १९७८ मध्ये जे. के. फाईल्स इंजिनिअरींग ही कंपनी सुरु झाली. या कंपनीत रत्नागिरीतील शेकडोजण नोकरी करत आहेत. आजही या कंपनीत सुमारे तीनशे ते चारशे कामगार कायमस्वरुपी या ठिकाणी कामाला आहेत. या कंपनीमध्ये पूर्वी सात डिपार्टमेंटमध्ये काम चालत होते. फाईल्स तयार करण्याचे काम त्यानंतर मिरजोळे एमआयडीसीत अन्य ठिकाणी देण्यात येत होते.या कंपनीतून रत्नागिरीत बाहेर देण्यात येणारी काम बंद झाली आहेत. तर कंपनीमध्ये असणारे ठेकेदारांचे कामगारही हळूहळू कमी करण्यात येऊ लागले. मालाला उठाव नसल्याचे कारण देत संचालक मंडळाने कामही कमी केले. याचवेळी चिपळूण खडपोलीतील कामे मात्र वाढली आहेत.जे. के. फाईल्स कंपनीचे काही संचालक रत्नागिरीत आले होते. त्यांनी कामगारांशी संवाद साधला. यावेळी मालाचा उठाव होत नाही व कंपनीला परवडत नसल्याचे सांगण्यात आले. कंपनी कामगारांना प्रत्येकी सात लाख व अन्य योजनांचा लाभ देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. मात्र कामगारांकडून फारसा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. परंतु, कंपनी बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे.
रत्नागिरीतील जे. के. फाईल्स कंपनीला लागणार टाळे?
By मनोज मुळ्ये | Published: June 17, 2023 7:01 PM