रत्नागिरी : अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे राज्यभरात जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले असून रत्नागिरी येथे जेलभरो आंदोलन पुकारले होते. शहरातील प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी एकत्रीत येऊन सभा घेतली. त्यानंतर स्वत:ला अटक करुन घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानधन वाढ जाहीर केली. ती ताबडतोब देण्यात यावी. पीईएमएस प्रणालीद्वारे होणारे मानधन रजिस्ट्रेशन न झाल्याने अनेक सेवीका सात महिने मानधनापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारी पडले तरी सलग रजा घेता येत नाही. त्या दिवसाचे मानधन कपात केली जाते. सहा वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना पीएचआर पुरवला जातो. तो खाण्यायोग्य नाही. कुपोषण कमी होईल असा योग्य सकस आहार सहा महिने ते तीन वर्षे मुले, गरोदर माता, स्तनदा माता यांना मिळावा.
२०१५ पासून प्रवास भत्ता, बिले देण्यात आलेली नाहीत. ती ताबडतोब देण्यात यावीत. आहार बिले दरमहा मिळावीत. अंगणवाड्यांचा आहार शिजविण्यासाठी मिळणारे इंधन (रॉकेल) रास्त दर धान्य दुकान मिळाले नाही तर आहार कसा शिजवावा हा प्रश्न आहे.भरती प्रक्रिया बंद केल्यामुळे कामकाज विस्कळीत झाले आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया त्वरित सुरु करावी. अंगणवाड्यांचे समायोजन थांबविण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले.