दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणातील संशयित आरोपी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना गुरुवारी रात्री पोलिसांनी केली अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आधी ईडीने कारवाई केली आणि आता दापोलीपोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.नियम धाब्यावर बसवून साई रिसॉर्टला बिनशेती परवानगी देण्यात आल्याचा ठपका जयराम देशपांडे यांच्यावर ठेवला आहे. या प्रकरणी दापोलीचे गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनी तक्रार केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार ही कारवाई झाली आहे.जयराम देशपांडे सध्या रायगड जिल्हा रोजगार हमीचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते दापाेलीचे प्रांताधिकारी होते, त्या काळात साई रिसॉर्टला परवानगी देण्यात आली. याच प्रकरणावरून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.महसूल तसेच पर्यावरण खात्याच्या नियमांचे उल्लंघन करून साई रिसॉर्ट बांधण्यात आल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण खात्याने नेमलेल्या समितीने या रिसॉर्टची पाहणी करून ते अनधिकृत असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर पुढील कारवाईने वेग घेतला आहे. या प्रकरणी ईडीने प्रथम उद्योजक सदानंद कदम यांना आणि नंतर प्रांताधिकारी देशपांडे यांना अटक केली.दरम्यान, दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिघे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून मंडल अधिकारी सुधीर पारदुले यांना पोलिसांनी अटक केली होती. पारदुले यांची आता जामिनावर सुटका झाली आहे. त्यानंतर आता तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना दापोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.परब यांना १७ पर्यंत दिलासाजिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांचे नाव साई रिसॉर्टशी वारंवार जोडले जात आहे. त्यांच्याविरुद्ध खटलाही दाखल झाला आहे. परंतु त्यांनी केलेला पुनर्विलोकन अर्ज न्यायालयाने मान्य केल्यानंतर आता १७ एप्रिलपर्यंत तपास यंत्रणांनी त्यांना अटक करू नये, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सध्या तरी या प्रकरणातून अनिल परब यांना दिलासा मिळाला आहे.
Ratnagiri- साई रिसॉर्ट प्रकरण: तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 4:11 PM