जैतापूर : जैतापूर विविध कार्यकारी सोसायटीचा अनागोंदी कारभार सुुरुच असून, सप्टेंबरमध्ये ग्रामस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभा उधळून लावल्यानंतर ती दीड महिन्यांनी पुन्हा घेण्याचे आश्वासन देणाऱ्या सभासदांनी अद्याप सभा घेतलेली नाही. एवढेच नव्हे; तर आता खरेदी-विक्री संघातून खरेदी केलेले ८५ हजार रुपये किमतीचे खत सोसायटीने खरेदीच केले नसल्याचे उघड झाले आहे. जैतापूर विविध कार्यकारी सोसायटीची जैतापुरात दोन रास्त धान्य दुकाने आहेत. विशेष म्हणजे या धान्य दुकानातील धान्यसाठ्याबद्दल अध्यक्ष शरफुद्दीन काझी आणि संचालकांना कोणतीच माहिती नाही. दि. ३० सप्टेंबर रोजी या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. या सभेत सोसायटीच्या हिशोबाचे वाचन झाले नाही तसेच सोसायटीला झालेला नफा-तोटाही सांगण्यात आला नाही. त्यामुळे रेशनकार्डधारक आणि ग्रामस्थांनी ही सभा उधळून लावली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अध्यक्ष काझी यांनी दीड महिन्याने पुन्हा सभा घेण्याचे जाहीर केले. या घटनेला आता अडीच महिने उलटत आले तरी सभा बोलावली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. सोसायटीने खरेदी-विक्री संघातून ८५ हजार रुपयांचे खत खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखवले. मात्र, प्रत्यक्ष सोसायटीने हे खतच खरेदी केले नसल्याचे सांगण्यात येते. राजापूर खरेदी-विक्री संघाच्या दप्तरी मात्र या सोसायटीने खत खरेदी केल्याची नोंद आहे. त्यामुळे हे खत गेले कोठे, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. महिन्यातील १८ दिवस या सोसायटीच्या रेशन दुकानात धान्यच येत नसल्याची बाबही पुढे आली आहे. याबाबत राजापूरचे पुरवठा निरीक्षक राजेंद्र देवळेकर यांच्याशी संपर्क साधला असता सोसायटीने धान्य खरेदी करण्यासाठी आपला प्रतिनिधीच पाठविला नसल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. ही सोसायटी धान्य खरेदीसाठी आपला प्रतिनिधी महिनाअखेरच पाठवते, असे देवळेकर यांनी सांगितले. त्यामुळे ही सोसायटी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. (वार्ताहर)
जैतापूर सोसायटीची अनागोंदी सुरुच
By admin | Published: December 23, 2014 12:47 AM