चिपळूण : महापुरात नुकसान झालेल्या व आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू व्यावसायिकांना मशीनरी, अत्यावश्यक उपकरणे, व्यवसायासाठी धनादेशाच्या स्वरूपात आर्थिक मदत प्रदान करत जमात ई-इस्लामी हिंद महाराष्ट्रने लाखमोलाची केली. या मदतीचे वाटप बुधवारी शहरातील भोगाळे येथील माधव सभागृहात एका कार्यक्रमात करण्यात आले.
जमात ई-इस्लामी हिंद, महाराष्ट्र ही एक राष्ट्रीयस्तरावरील संस्था आहे. आयडियल रिलिफ विंग महाराष्ट्राने (आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्य टीम) पुराच्या पहिल्याच दिवसापासून कोकणात काम सुरू केले आहे. ज्यात वैद्यकीय मदत, रेशन किट, जीवनावश्यक वस्तू, विहिरींसारख्या पाणवठ्यांची साफसफाई, व्यावसायिक मदतीची तरतूद, इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग मेकॅनिक्स इत्यादीबाबतीत जमात ए इस्लामी हिंदने पूरग्रस्तांना मदत पुरवली आहे. या संस्थेमार्फत पहिल्या टप्प्यात ८० व्यावसायिकांना प्रत्येकी दहा हजारांपासून एक लाखापर्यंत सुमारे २० लाख ८० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. किराणा, कपडे, पादत्राणे, बॅग, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रिकल्स, मोबाईल दुरुस्ती आणि उपकरणे, इलेक्ट्रॉनिक दुरुस्ती, वेल्डिंग कार्यशाळा, सर्व्हिसिंग सेंटर, फॅब्रिकेशन वर्क, झेरॉक्स सेंटर, ऑनलाइन सेवा केंद्र, क्रोकरी कटलरी दुकाने आदींना मदत देण्यात आली.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लहान आणि मध्यम उद्योगांसाठी सुमारे २२ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली. झेरॉक्स मशीन, वेल्डिंग मशीन, हँड ड्रिल, हँड कटर, ब्लोअर, स्प्रे, लॅपटॉप, प्रिंटर, लॅमिनेशन मशीन आदी उपकरणे देण्यात आली. याशिवाय कोकण पूरग्रस्तांसाठी अंदाजे १ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि पुनर्वसन प्रकल्पाच्या स्वरूपात चिपळूण, महाड आणि त्यांच्या शेजारील गावांमध्ये वाटप करण्यात आले. यामध्ये २५० व्यावसायिकांसाठी बिनव्याजी आर्थिक मदत व ५० कुटुंबीयांना घरे आणि मालमत्तांची दुरुस्तीसाठी मदत केली जाणार आहे.
या कार्यक्रमात संबंधितांना धनादेश देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मुअज्जम असरे होते. तसेच व्यासपीठावर मझहर फारूक, जमात ए इस्लामी हिंदच्या समाजसेवा विभागाचे सचिव ईसाफ अशरफ, कोकण प्रदेशचे अब्दुल्ला साहीबोले, स्थानिक अध्यक्ष फरहान हुसेन, अमानुद्दीन इनामदार, डॉ. हुजैफा खान, कोकण प्रदेश युवा प्रभारी जुनैद बगदादी, चिपळूण मुस्लिम समाज अध्यक्ष नाझिम अफवारे, नगरसेवक शौकत काद्री, मोहम्मद पाते, शकील सुर्वे, रफिक सुर्वे, आरिफ वेलिस्कर, इब्राहिम वांगडे, इब्राहिम दळवी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जमात ए इस्लामी हिंद चिपळूण, स्टुडेंट इस्लामिक ऑर्गनायझेशन चिपळूण, युथ विंग चिपळूण आणि आयडीएल रिलिफ विंगच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.