रत्नागिरी : अटक नाट्यामुळे स्थगित झालेली भाजपाची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी पुन्हा रत्नागिरीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याच उपस्थितीत सुरू झाली. याआधी झालेल्या राजकीय गोंधळामुळे मनाई आदेश असतानाही भाजपाने जनआशीर्वाद यात्रा काढण्याची भूमिका कायम ठेवली आणि त्यानुसार मंत्री नारायण राणे यांचे कार्यक्रम सुरू झाले आहेत.
सकाळी नियोजित वेळेत मंत्री नारायण राणे यांचे विमानतळावर आगमन झाले. अकरा वाजता मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि तेथून जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. त्यानंतर माजी खासदार लोकनेते स्व. शामराव पेजे तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करुन ते गोळप (ता. रत्नागिरी) येथे आंबा व काजू उत्पादकांच्या बैठकीसाठी रवाना झाले.