राजापूर : केेंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली जनआशीर्वाद यात्रा २७ आगॅस्ट रोजी राजापुरात दाखल होत आहे. सायंकाळी ४.२५ वाजता ही जनआशीर्वाद यात्रा राजापुरात येणार आहे. राजापूर एस. टी. डेपोसमोरील जैतापकर बिल्डर्स प्रांगणात या नारायण राणे यांचे व जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत होणार आहे. ही माहिती भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी दिली आहे. नारायण राणे राजापुरात येणार असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.
२७ ऑगस्टपासून पुन्हा ही जनआशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. रत्नागिरी, हातखंबा, पाली आणि लांजानंतर यात्रा सायंकाळी ४.२५ वाजता राजापुरात येणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी भाजपतर्फे करण्यात आली आहे. राजापुरात एस. टी. डेपोसमोरील जैतापकर बिल्डर्स प्रांगणात यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी मंत्री राणे यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर राजापुरातील रिफायनरी समर्थक संघटनांसह विविध सामाजिक संघटना राणे यांची भेट घेणार आहेत. या संघटनांशी राणे संवाद साधणार आहेत. त्यानंतर राणे मार्गदर्शन करणार आहेत. राणे व या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व राजापूरवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अभिजित गुरव यांनी केले आहे.